एलएसीवर संघर्ष ‘जैसे थे’; हिंदुस्थान-चीनमध्ये उद्या पुन्हा बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) हिंदुस्थान आणि चीनमध्ये संघर्ष ‘जैसे थे’ असून यावर तोडगा काढण्यासाठी या दोन देशांमध्ये बुधवारी सकाळी 9.30 वाजता पुन्हा बैठक होणार आहे. वरिष्ठ सर्वोच्च सैन्य कमांडर पातळीवर चर्चेची ही चौदावी फेरी असेल. चुशुल-मोल्दो पॉइंटवर चीनच्या भागात ही बैठक होणार असून यात विविध महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर चर्चा होईल. त्यामुळे या बैठकीकडे दोन्ही देशांचे लक्ष लागले आहे.

हिंदुस्थान आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील संघर्ष मिटवण्याच्या हेतूने करार झाला होता. या कराराचे चीनने वारंवार उल्लंघन केल्याचा हिंदुस्थानचा दावा असून बुधवारच्या बैठकीत या मुद्दय़ावर भर दिला जाणार आहे. यापूर्वी कमांडर पातळीवर झालेल्या बैठकांमध्ये चीनच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे काहीच निष्पन्न झालेले नाही. कोअर कमांडर पातळीवरील बैठकीची 13वी फेरी चुशुल-मोल्दो सीमेवर पार पडली होती. चीनने आता पश्चिमी क्षेत्रामध्ये एलएसीवर शांतता राखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी हिंदुस्थानकडून केली जाणार आहे. या दोन देशांच्या सैन्यामध्ये 5 मे 2020पासून पूर्व लडाख क्षेत्रात संघर्ष सुरू झाला. पँगाँग सरोवर परिसरातील हिंसाचारानंतर दोन्ही देशांनी एलएसीवर मोठय़ा प्रमाणावर जवान आणि युद्धसामग्री तैनात केली.

सप्टेंबर महिन्यात दुशांबेमध्ये हिंदुस्थान आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली होती. दोन्ही देशांच्या सैन्य आणि राजनैतिक अधिकाऱयांनी पूर्व लडाखमधील एलएसीबरोबर इतर मुद्दय़ांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू ठेवावी, याबाबत परराष्ट्रमंत्र्यांमध्ये एकमत झाले होते.