
मराठा आरक्षणप्रश्नी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक होणार असल्याची माहिती मराठा आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. मराठा समाजाने आरक्षणासाठी 58 लक्षवेधी मोर्चे काढले. त्याची दखल सर्वांनीच घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले. कोरोनाकाळात यावरून पुन्हा आंदोलन, उद्रेक हे शब्द उच्चारणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा झाली. येत्या 27 किंवा 28 मे रोजी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. तसेच विरोधी पक्षांसह सर्व ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण कसे मिळेल याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आंदोलनाची पुढील भूमिका ठरवण्यासाठी आज सकाळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून संभाजीराजे यांनी महाराष्ट्र दौऱयाला प्रारंभ केला.
































































