दक्षिण-मुंबईत काँग्रेसला कार्यकर्त्यांच्या कमतरतेचा फटका, महायुतीची प्रचारात मुसंडी

सामना प्रतिनिधी, मुंबई

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला आता रंग चढू लागला आहे. पत्रक वाटप आणि प्रचारफेऱ्यांचा टप्पा संपल्यानंतर आता चौकसभांचा टप्पा सुरू झाला आहे. या मतदारसंघात 13 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत आहे ती शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीमध्ये. एकीकडे असंख्य कार्यकर्त्यांच्या जोरावर महायुतीने प्रचारात मुसंडी मारली आहे तर दुसरीकडे काँग्रेस आघाडीला प्रचारासाठी कार्यकर्त्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रचारासाठी मनसे कार्यकर्त्यांचा आधार घेण्याची नामुष्की काँग्रेस आघाडीवर ओढवली आहे.

देवरांची पिछाडी आणि नामुष्की
काँग्रेस आघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा हे प्रचारामध्ये महायुतीच्या तुलनेत बरेच मागे आहेत. त्यांनी फक्त कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल परिसरातील उच्चभ्रू वसाहती आणि झोपडपट्टय़ांवर आपले लक्ष केंद्रित केले असल्याचे चित्र आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपदही देवरा यांच्याकडे असल्याने त्यांना स्वतŠचा प्रचार सांभाळत मुंबईतील इतर मतदारसंघांतील प्रचाराचाही सतत आढावा घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांना स्वतŠच्या प्रचारालाही वेळ मिळेनासा झाला आहे. म्हणूनच मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना प्रचारासाठी बोलवण्याची पाळी त्यांच्यावर आली.

महायुतीच्या प्रचारात मुस्लिम, जैन बांधवांचीही गर्दी
महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा, मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, वरळी आणि शिवडी अशा सहाही मतदारसंघांतील बहुतांश भागांमध्ये प्रचारफेऱया पूर्ण केल्या. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या प्रचारफेरीत मुस्लिम तरुण आणि महिलाही सहभागी होऊन ‘शिवसेना झिंदाबाद’चा जयघोष करताना दिसल्या. वरळी आणि शिवडी मतदारसंघात गिरणी कामगार प्रचारफेरीत सहभागी झाले होते तर मुंबादेवी, मलबार हिलमध्ये गुजराती, मारवाडी आणि जैन बांधवांनी धनुष्यबाणालाच मते द्या, असे आवाहन केले.

काँग्रेसला आचारसंहितेचा भंग महागात पडणार
जैन समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मिलिंद देवरा यांना महागात पडण्याची शक्यता दिसू लागली आहे. झवेरी बाजार येथे झालेल्या सभेत त्यांनी जैन मतदारांना शिवसेनेविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला होता. शिवसैनिकांनी जैन मंदिरांबाहेर मांस शिजवल्याचे विधान त्यांनी केले होते. खोटी व वादग्रस्त विधाने करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल देवरा यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाली होती. निवडणूक आयोगानेही त्यांना दोषी ठरवल्याने केवळ दक्षिण मुंबईच नव्हे तर मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही चलबिचल झाली आहे.

वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला धडकी
वंचित बहुजन आघाडीनेही काँग्रेससमोर आव्हान निर्माण केले आहे. या आघाडीचे उमेदवार डॉ. अनिलकुमार यांना मुस्लिम आणि दलित वस्त्यांमध्ये चांगला प्रतिसाद लाभत आहे. आपली पारंपारिक वोट बँक वंचित बहुजन आघाडीकडे जात असल्याचे पाहून काँग्रेसला धडकी भरली आहे. या आघाडीत एमआयएम हा पक्षही असल्याने मुस्लिम मते मोठय़ाप्रमाणात डॉ. अनिलकुमार यांच्याकडे वळण्याच्या शक्यतेने काँग्रेस उमेदवार देवरा हे चिंतेत पडले आहेत.