
पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तब्बल 13 तासांच्या ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील एकूण 145 लोकल फेऱया रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे सुट्टीत फिरण्यासाठी घराबाहेर पडणाऱया प्रवाशांचे हाल होणार आहेत.
ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान पूल क्रमांक 5 वर गर्डरिंगचे काम केले जाणार आहे. त्यासाठी शनिवारी रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ब्लॉक जाहीर केला आहे. या अवधीत मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यानच्या सर्व अप धीम्या गाडय़ा अप जलद मार्गावर चालवल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे चर्चगेट आणि माहीमदरम्यानच्या डाऊन धीम्या मार्गावरील गाडय़ा डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील. या गाडय़ा प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माहीम आणि माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत. ब्लॉकदरम्यान डाऊन मार्गावर शनिवारी रात्री 10 लोकल फेऱया तसेच रविवारी 62 फेऱया रद्द केल्या जाणार आहेत. यात केवळ तीन एसी लोकल असून उर्वरित साध्या लोकलचा समावेश आहे. अप मार्गावर शनिवारी रात्री ते रविवारी दुपारपर्यंत एकूण 73 लोकल फेऱया रद्द केल्या जाणार आहेत. याव्यतिरिक्त अनेक गाडय़ांचा प्रवास वांद्रे, दादर स्थानकांवर समाप्त करण्यात येणार आहे. तसेच प्रभादेवीतील आरओबी हटविण्यासाठी डाऊन धिम्या मार्गावर 7.30 तासांचा मोठा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे.
ट्रान्स हार्बरची सेवा बंद राहणार
ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, नेरूळ स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉकमुळे ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत वाशी, नेरूळ आणि पनवेलकडे जाणाऱया लोकल फेऱ्या तसेच पनवेल, नेरूळ, वाशी येथून ठाणेकडे येणाऱया लोकल फेऱया सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत रद्द राहतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाने शनिवारी जाहीर केले.
मध्य रेल्वेवर उद्या 5 तास ‘लोकल गोंधळ’
मध्य रेल्वेवर रविवारी पाच तास ‘लोकल गोंधळ’ सुरू राहणार आहे. देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी रेल्वे प्रशासनाने मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक जाहीर केला आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 या वेळेत सुटणाऱया डाउन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा-मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच ठाणे येथून सकाळी 11.07 ते दुपारी 3.51 या वेळेत सुटणाऱया अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकावरून अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.





























































