एल्फिन्स्टन पुलाचा उरलेला भाग आठवडाभरात पाडणार, मध्य रेल्वेवर चार तासांचा ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
elphinstone railway bridge demolition

ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल येत्या आठवडाभरात इतिहासजमा होणार आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीतील पुलाचा लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी एकूण 26 तासांचे सहा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. सलग पाच रात्री 11.45 ते पहाटे 3.45 वाजेपर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यापैकी एक तास रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार असून उर्वरित तीन तासांत कमी अंतराच्या लोकल फेऱया रद्द करण्यात येणार आहेत. शनिवारी-रविवारी साडेसहा तास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादरपर्यंत रेल्वे वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा रात्रीच्या प्रवासात खोळंबा होणार आहे.

आठवडाभरापूर्वी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील एल्फिन्स्टन पुलाचे 100 वर्षांहून अधिक जुने गर्डर्स एका रात्रीत हटवण्यात आले होते. पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील पुलाचा संपूर्ण लोखंडी सांगाडा हटवल्यानंतर मध्य रेल्वेकडून ब्लॉकला मंजुरी देण्यासंबंधी प्रशासकीय पातळीवर हालचालींना गती देण्यात आली. त्यानुसार एका दिवसात ब्लॉकबाबत अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजते. मध्य रेल्वेचे वरिष्ठ प्रशासन आणि ‘महारेल’ यांच्यात झालेल्या अंतिम निर्णयानुसार, सोमवारी रात्री चार तासांचा ब्लॉक घेऊन पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली. 132 मीटर लांबीचा मुख्य गर्डर आणि पॅनल हटवण्यासाठी एकूण 26 तासांचे सहा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यानुसार सलग पाच रात्री ब्लॉक घेताना टप्प्याटप्प्याने पुलाच्या गर्डर्सचे कटिंग केले जाणार आहे. डाऊन धिम्या, अप धिम्या, डाऊन जलद आणि अप जलद अशा मार्गिकांवरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद ठेवून पुलाचे महाकाय गर्डर्स हटवण्यात येणार आहेत. रात्री 11.45 ते पहाटे 3.45 या वेळेत रेल्वेचा ब्लॉक घेतला जाईल. या काळात कुर्ला, ठाणे अशा कमी अंतराच्या नऊ लोकल फेऱया रद्द करण्यात येतील, तर अनेक गाडय़ा ठाणे, कुर्ला, दादरपर्यंत चालवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणारी शेवटची रात्री 12.12 ची कर्जत लोकल रद्द न करता ती 12.30 मिनिटांनी दादर स्थानकातून चालवण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.

शनिवारी-रविवारी रखडपट्टी होणार

एल्फिन्स्टन पुलाचा अंतिम भाग हटवण्यासाठी शनिवारी-रविवारी साडेसहा तासांचा अंतिम ब्लॉक घेण्याचे नियोजन आहे. त्यावेळी मुख्य लोखंडी गर्डर आणि बीम पूर्णपणे हटवले जाणार आहेत. हे महत्त्वपूर्ण काम पूर्णत्वास नेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादरपर्यंतची लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची वाहतूक ब्लॉकच्या साडेसहा तासांत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात अनेक लोकल फेऱया रद्द केल्या जातील. तसेच जवळपास 10 ते 15 मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची वाहतूक दादरपर्यंत चालवण्यात येणार असल्याचे समजते. अंतिम ब्लॉक कोणत्या सहा तासांत घ्यायचा हे अद्याप निश्चित झालेले नाही. तथापि, अनेक लोकल फेऱया आणि मेल-एक्स्प्रेस गाडय़ांवर परिणाम होणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत