
या रविवारी 13 नोव्हेंबर रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गांवर शनिवारी (12 नोव्हेंबर आणि रविवार, 13 नोव्हेंबर 2022) मध्यरात्री 23.50 ते 02.50 पर्यंत पश्चिम रेल्वेने ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी आणि रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक 19101 विरार-भरूच 04.35 च्या नियोजित वेळेत सुटण्याऐवजी विरारहून 04.50 वाजता 15 मिनिटे उशीराने निघेल.
मध्य रेल्वेचा माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक
देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वे मेगाब्लॉक घेणार आहे. माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्या त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील. ठाण्याच्या पलीकडे या जलद गाड्या पुनश्च डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील. त्यापुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर वळविल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
हार्बर रेल्वेचा पनवेल- वाशी अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक
हार्बर रेल्वेचा पनवेल- वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात बेलापूर/नेरुळ-खारकोपर या सेवा प्रभावित होणार नाही. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागांत विशेष उपनगरीय गाड्या धावतील. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.



























































