नोकरभरतीची खूशखबर, केंद्र सरकार वर्षभरात 1 लाख रिक्त पदे भरणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेरोजगारीवरून टीकेचे लक्ष्य बनलेल्या केंद्र सरकारने नोकरभरतीची खूशखबर दिली. विविध सरकारी विभागांत जवळपास 7 लाख पदे रिक्त आहेत. यातील 1 लाखाहून अधिक पदे सरकार पुढील वर्षभरात भरणार आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जीतेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली.

रिक्त पदे भरण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनने भरती प्रक्रिया सुरू केली असून या प्रक्रियेअंतर्गत वर्षभरात 1,05,338 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे असे राज्यमंत्री जीतेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सांगितले. 2017-18 दरम्यान रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे भरती मंडळामार्फत मध्यवर्ती रोजगार अधिसूचनेला अनुसरून 1,27,573 पदांसाठी अधिसूचना जारी केली होती. याशिवाय 2018-19 मध्ये ‘क’ प्रवर्ग आणि लेव्हल-1 वरील पदासाठी पाच मध्यवर्ती रोजगार अधिसूचना काढण्यात आल्या. त्यात 1,56,138 पदे रिक्त असल्याचे म्हटले आहे. एकूण 4 लाख 8 हजार 591 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली  असे जीतेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.

– 1 मार्च 2018 पर्यंतच्या आकडेवारीनुसार ‘क’ प्रवर्गातील 5,74,289, ‘ब’ प्रवर्गातील 89,638 तर ‘ए’ प्रवर्गातील 19,896 पदे रिक्त आहेत. या एकूण रिक्त पदांची संख्या 6,88,823 आहे.

– 1 जानेवारी 2016 पासून अनेक पदांसाठी मुलाखती बंद करण्यात आल्या. बहुतांश परीक्षा ऑनलाइन घेतल्या जात आहेत. एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील आरक्षित रिक्त पदांची संख्याही मोठी आहे.