मेहेरबाबाच्या अमरतिथीला 60 हजार मेहेरप्रेमींनी पाळले मौन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवतार मेहेरबाबा यांनी त्यांच्या समाधी स्थळी 31 जानेवारीला देहत्याग केला होता. त्याचे स्मरण म्हणून 50व्या अमरतिथी सोहळ्यात म्हणून दुपारी 12 वाजता नगर येथील दौंड रोडवरील मेहराबाद (अरणगाव)येथे सुमारे 60 हजार भाविकाचे मौन पाळले. दुसरीकडे याच वेळी जगात लाखो भाविकांनी मौन पाळले.

गुरुवारपासून सुरू झालेल्या अमरतिथीसाठी चाळीस हजार भाविक बसतील असा भव्य मंडप तयार करण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त जेथे मिळेल भाविक बसून होते. कोठेहि गडबड,गोंधळ नव्हता रात्री उशिरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता. त्यात देश-विदेशातील मेहेरप्रेमीनी भजने, गजल, नृत्ये, कव्वाली, गाणे, नाटिका सादर केल्या. शुक्रवारी सकाळी सात वाजता मुख्य मंडपात प्रेममिलन कार्यक्रम सुरू झाला तो रात्री उशिरापर्यत चालू होता. शुक्रवारीही समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या होत्या. जगातील 70 देशातून व हिंदुस्थानातून सुमारे लाखाच्यावर मेहेरप्रेमी आले आहेत तर परदेशातील 350 भाविक आले आहेत.

दुपारी साडे अकरा वाजता चेअरमन श्रीधर केळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मेहेरनाथ कलचुरी, रमेश जंगले, श्री थाडे बंधू आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर ‘बिगिन दि बिगिन’ ही धून पावणे बारा वाजता वाजवण्यात आली. नंतर नगर सेंटरतर्फे मेहेरधून म्हणण्यात आली. बरोबर दुपारी 12 वाजता मौनास सुरुवात झाली. यावेळी सर्वत्र टाचणी पडली तरी समजेल इतकी शांत वातावरण होते. 15 मिनिटानंतर अवतार मेहेर बाबा की जय च्या जयघोषात मौन सोडण्यात आले. यावेळी टेकडीवर सुमारे 60 हजारांच्यावर भाविक होते. अवतार मेहेरबाबांनी मौनास सुरुवात केल्यावर शेवटपर्यंत मौन पाळले, म्हणून हे महामौन पाळले जाते.

या परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर आहे. अग्निशमन दलही सुसज्ज आहे. तसेच परिसरात अनेक उपहारगृहे, प्रसादाची दुकाने तसेच इतर दुकानेही मोठ्या प्रमाणात आहेत. हजारो जण येथे स्वयंसेवकांचे काम करत आहेत.