मेहुल चोक्सीला अखेर बेडय़ा; हिंदुस्थानकडे थेट ताबा देणार; एंटिगाच्या पंतप्रधानांनी दिले स्पष्ट संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 13,500 कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी, फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला अखेर मंगळवारी डोमिनिकामध्ये बेडय़ा ठोकल्या आहेत. त्याला पुढील 48 तासांत थेट हिंदुस्थानकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. एंटिगा आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊने यांनीच याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांनी चोक्सीला थेट हिंदुस्थानकडे सोपवा, अशी सूचना डोमिनिका सरकारला केली आहे.

पीएनबी घोटाळ्याचा मास्टरमाइंड नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सी हा चार दिवसांपूर्वीच एंटिगातून फरार झाला होता. त्यानंतर त्याच्याविरुद्ध इंटरपोलने ‘येलो नोटीस’ जारी केली होती. तो फिल्मी स्टाईलने एंटिगामधून बोटीतून पळून डोमिनिकाला गेला होता. तेथे मंगळवारी रात्री त्याला पकडण्यात आले. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. त्याला पुन्हा एंटिगाच्या ताब्यात न देता थेट हिंदुस्थानकडे सोपवा. हिंदुस्थानमध्ये चोक्सीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी त्याला हिंदुस्थानच्या ताब्यात सोपवण्याची गरज आहे. या प्रक्रियेत कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही. त्यामुळे त्याला पुढील 48 तासांत खासगी विमानाने हिंदुस्थानला पाठवले जाऊ शकते, असे एंटिगाचे पंतप्रधान ब्राऊने यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. चोक्सीने 2017 मध्ये एंटिगा आणि बारबुडाचे नागरिकत्व घेतले होते. मे 2018 पासून तो तेथे राहत होता. हिंदुस्थानमध्ये नेण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी तो चार दिवसांपूर्वी गायब झाला होता. मात्र तो स्वतःच्याच जाळ्यात अडकला. आता एंटिगाच्या पंतप्रधानांनी त्याला हिंदुस्थानकडे प्रत्यार्पित करण्याबाबत डोमिनिकाच्या अधिकाऱयांना स्पष्ट निर्देश दिल्यामुळे हिंदुस्थानी तपास यंत्रणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मेहुल चोक्सीचा जन्म 5 मे 1959 रोजी मुंबईत झाला होता. त्याने गुजरातच्या पालनपूरमधून हिऱ्यांच्या विश्वात पाऊल ठेवले होते. नंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. ज्वेलरीच्या दुनियेत त्याचे नाव आघाडीवर आले. त्याच्या गितांजली कंपनीची वार्षिक उलाढाल जवळपास 13 हजार कोटींच्या घरात आहे. भाचा नीरव मोदीच्या मदतीने त्याने पीएनबी घोटाळा करून परदेशात धूम ठोकली होती. पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करीत नीरव मोदी व चोक्सीने हजारो कोटींचा घोटाळा केला. या प्रकरणात दोघांची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी सुरू आहे.