रेड कॉर्नर नोटीसशिवायही होऊ शकते मेहूल चोक्सीचे प्रत्यार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रेड कॉर्नर नोटीसशिवायही 13 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी यांचे एंटीगुआतून प्रत्यार्पण होऊ शकते असे सीबीआयने म्हटले आहे. फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात येते. मात्र, मेहूल चोक्सी एंटीगुआची नागरिकती घेऊन तेथे राहत असल्याचे एंटीगुआने स्पष्ट केले आहे. चोक्सीचा ठावठिकाणा समजल्याने रेड कॉर्नर नोटीसची गरज नसल्याचे सीबीआयने परराष्ट्र मंत्रालयाला सांगितले आहे.

एंटीगुआतील संबंधित यंत्रणांना पत्र पाठवून मेहूल चोक्सीला ताब्यात घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच एंटीगुआने त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची विनंतीही तेथील यंत्रणांना करण्यात आली आहे. एंटीगुआ आणि बारबुडा या देशांशी हिंदुस्थानचे प्रत्यार्पणाबाबत करार नाहीत. मात्र, दोन्ही देश राष्ट्रकुल देशांचे सदस्य असल्याने त्यांना हिंदुस्थानच्या प्रत्यार्पण कायदा 1962 लागू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने एंटीगुआला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

आपल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात येऊ नये अशी विनंती चोक्सीने इंटरपोलला केली होती. आपल्यावरील आरोप राजकीय हेतून प्रेरीत असल्याचा कांगावा त्याने केला होता. हिंदुस्थानातील तुरुंगाची दूरवस्था असून तेथे मानवाधिरांचे उल्लंघन होईल. त्यामुळे आपल्याला न्याय मिळणार नाही असा आरोप करत प्रसारमाध्यमांनी अतिरंजितपणे आपल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्याचे तो म्हणाला. या वृत्ताचा न्यायव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता त्याने वर्तवली होती. याबाबत इंटरपोलने सीबीआयकडे विचारणा केली. सीबीआयने चोक्सीचे दावे आणि आरोप खोडून काढत इंटरपोलला उत्तर पाठवले होते. सुमारे 13 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी हे प्रमुख आरोपी आहेत. हा घोटाळा उघड होण्याआधीच त्यांनी परदेशात पलायन केले होते. मेहूल चोक्साने 15 जानेवरी 2017 मध्ये एंटीगुआचे नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. नोव्हेंबर 2017 मध्ये एंटीगुआ सरकारने त्याच्या नागरिकत्वाला परवानगी दिली होती.