पंजाब नॅशनल बँक घोटाळा; मेहुल चोकसी ऍण्टीगुआतून पळाला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला आरोपी मेहुल चोकसी चार वर्षांपासून अँटीगुआ देशात वास्तव्याला आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून तो अँटीगुआतूनही पळाला असून स्थानिक पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती समोर आहे.

मेहुल चोकसीने पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा केल्यानंतर 2018 मध्ये हिंदुस्थानातून पळ काढला होता. अनेक महिने त्याचा शोध घेतल्यानंतर अँटीगुआ देशातील बारबुडा येथे वास्तव्याला असून त्याने 2017 मध्ये त्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर सीबीआय आणि ईडीने कारवाईचा फास आवळत त्याला हिंदुस्थानात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र आपली प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत त्याने परतण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याच्यावर खटला सुरू असून अनेकदा तो व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला हजर राहतो; पण रविवारपासून तो बारबुडा तेथूनही गायब झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमध्यमांनी दिले आहे.