विधान परिषदेत दादांच्या आठवणींना उजाळा; दिवंगत सदस्यांना आदरांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सदस्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. दादांचा स्पष्टवत्तेपणा, कडक शिस्त आणि बाणेदारपणाबद्दल सदस्यांनी आठवणींना उजाळा दिला. माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक मोडक, गंगाधर पटने, निला देसाई या दिवंगत सदस्यांनादेखील या वेळी आदरांजली वाहण्यात आली.

राज्याची आर्थिक घडी अजितदादांमुळे शाबूत – सचिन अहिर

दर गुरुवारी अजितदादांचा जनता दरबार असायचा. त्या वेळी आम्ही सकाळी 8 वाजता मोबाईलवर अलार्म लावून ठेवायचो. कारण दादांचा पह्न येणार म्हणजे येणारच, अशी कडक शिस्त त्यांनी आम्हा सर्वांना लावली होती. त्यांच्या कडक शिस्तीमुळेच त्या-त्या नेतृत्वाने त्यांची अर्थ खात्यात निवड केली. राज्याची आर्थिक घडी शाबूत ठेवण्याचे काम दादांमुळे झाले आहे. त्यांच्या जाण्याने आपण राज्याचे हेडमास्तर गमावले, असे शिवसेना आमदार सचिन अहिर म्हणाले.

राज्याच्या आर्थिक नियोजनाला शिस्त लावणारा नेता – राम शिंदे

उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकप्रिय आणि जनाधार असलेले नेते होते. शिस्त आणि वक्तशीरपणा हे गुण त्यांनी अतिशय मेहनतीने कमावले. ग्रामीण, शहरी प्रश्नांची नेमकी जाण, प्रश्न समजावून घेण्याची हातोटी आणि निर्णय घेण्याची धडाडी यामुळे त्यांची प्रशासनावर पकड होती. विकासकामे हाच राजकीय वाटचाली आणि उत्कर्षाचा मार्ग आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. राज्याच्या आर्थिक नियोजनात शिस्त आणण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला, असे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले.

दोन्ही पायलट त्या दिवशी कुठे अडकले होते? – अमोल मिटकरी

माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी मला आमदार केले. दादांच्या मृत्यूबाबतीत ज्या काही शंका-कुशंका महाराष्ट्राच्या मनात आहेत त्यातील सत्य समोर आलेच पाहिजे. दादांच्या विमानासाठी नियुक्त केलेले साहिल मदन आणि यश नावाचे पायलट त्या दिवशी ट्रफिकमध्ये कुठे अडकले होते? निदान त्याचे तरी फुटेज द्या. ते कुठे आहेत ते तरी सांगा. सुमित कपूर कुठे गायब झाला हे महाराष्ट्राला कळले पाहिजे, असे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

दादांमुळे गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न मार्गी – प्रवीण दरेकर

मुंबईतल्या गिरणी कामगारांना शासनाने घरे दिली, पण घराचे 12 ते 15 लाख रुपये भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. कर्जाची परतफेड कशी करणार, असा प्रश्न असल्याने त्यांना कर्ज द्यायला कुणी तयार नव्हते. याप्रश्नी गिरणी कामगार माझ्याकडे आले. त्यानंतर मी अजितदादांची भेट घेत गिरणी कामगारांची पैफियत मांडली. दादांनी तत्काळ निर्णय घेतला आणि गिरणी कामगारांच्या मुलांना सहकर्जदार करण्यासाठी परवानगी दिल्याने गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागला असे भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले.

सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू

शोकप्रस्तावावर भाषणे सुरू असताना विधानसभेतील वातावरण भावूक झाले होते. सर्वपक्षीय नेत्यांनी अजित पवार यांच्या आठवणी सांगितल्या. या आठवणी ऐकताना  सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.