
रेल्वेमध्ये महिलांच्या डब्यात होत असलेल्या घुसखोरीवरून एकीकडे चिंता व्यक्त केली जात असताना रेल्वेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाकडे (आरपीएफ) असलेल्या रेल्वे कायद्यातील तरतुदीनुसार अशा प्रकरणातील आरोपींना शिक्षेची तरतूदच नसल्याने उघडकीस आले आहे.
मध्य रेल्वेच्या आकडेवारीनुसार साल 2018 मध्ये महिलांच्या डब्यांत घुसखोरी करणार्या 2,102 केसेस दाखल होऊन 8 लाख 12 हजार 350 रुपयांचा दंड या प्रकरणात जमा करण्यात आला होता. तर यंदा 2019 मध्ये ऑक्टोबर महिन्यांपर्यंत महिलांच्या डब्यांत घुसखोरी करणार्या 2,812 केसेस दाखल होऊन 2 लाख 41 हजार 100 रुपयांचा दंड रेल्वे सुरक्षा बलाने वसुल केला आहे.
मुंबई सकाळ आणि संध्याकाळच्या पिकअवरच्या काळात महिलांच्या राखीव डब्यात महिलांना शिरायला जागा नसते, परंतु नॉन पिकअवरमध्येच महिलांच्या डब्यात पुरूष प्रवाशांची घुसखोरी होत असते. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महिलांच्या डब्यांत लोहमार्ग पोलिसांनी होमगार्ड तसेच महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवानांची नेमणूक केली आहे, मात्र होमगार्डचे जवान पुरेसे प्रशिक्षित नसल्याचे आरपीएफचे म्हणणे आहे. सध्या मध्य रेल्वेच्या लेडीज स्पेशल लोकलला महिला आरपीएफचे संरक्षण पुरविण्यात आले आहे.
येथे होते सर्वाधिक घुसखोरी
रेल्वे सुरक्षा बलाने महिलांच्या डब्यात होणारी पुरुषांची घुसखोरी रोखण्यासाठी स्पेशल मोहीम सुरू केली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर घाटकोपर, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण येथे तर हार्बरच्या वाशी, मानखुर्द तसेच पनवेल येथे महिलांच्या डब्यांत फेरीवाले, गर्दुल्ले, तृतीयपंथीय तसेच टवाळखोरांची घुसखोरी होत असल्याचे रेल्वे सुरक्षा दलातील सूत्रांनी सांगितले.
केवळ 500 रुपये दंड
सध्या आरपीएफ रेल्वे कायदा कलम 162 नुसार महिलांच्या डब्यांत घुसखोरी करणार्यांवर कारवाई करते. या कलम 162 अनुसार अशा गुन्ह्यांत कमाल 500 रुपये दंडाची तरतूद असली तरी शिक्षेची तरतूद नसल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.
मध्य रेल्वेत महिलांच्या डब्यातील घुसखोरी
साल गुन्हे दंड
2018 2,902 8,12,350
2019 2,812 2,41,100 (ऑक्टोबर)


























































