
महिलांपेक्षा पुरेष हे खोटं बोलण्यात आणि मारलेली थाप पचवण्यात दुपटीने पटाईत असतात असं एका संशोधनातून उघड झालं आहे. खोटं बोलण्यात आपण उत्तम आहोत असा पुरुषांचा समज असल्याचाही दावा संशोधकांनी केला आहे. इंग्लंडमधल्या पोट्समाऊथ विद्यापीठातील संशोधकांनी उत्तम खोटं कोण बोलतात महिला का पुरुष याबाबत संशोधन केलं होतं. उत्तम खोटं बोलणारी माणसे बोलण्यात पटाईत असतात आणि घरच्यासोबत, साथीदारासोबत आणि मित्रांसोबत जास्त खोटं बोलतात असं संशोधनातून दिसून आलं आहे.
सराईतपणे खोटं बोलणारे समोरासमोर खोटं बोलणं जास्त पसंत करतात. अशी मंडळी समाजमाध्यमांवर फार खोटं बोलत नाही. यातही महिलांपेक्षा खोटं बोलण्यात पुरुष हे दुपटीने हुशार असतात आणि त्यांचा खोटं बोलून ते पचवण्यात आपण सरस असल्याचा समज असतो असं संशोधक ब्रिआना वेरीजिन यांनी म्हटले आहे. ब्रिआना या पोर्टसमाऊथ विद्यापीठाशिवाय नेदरलँडच्या मास्ट्रीच्ट विद्यापीठातही संशोधक म्हणन काम करतात. पूर्वीच्या संशोधनातून असं दिसून आलं होतं की माणसं दिवसातून एकदातरी खोटं बोलतात. ब्रिआना यांनी याबाबत सांगितलं की हा अंदाज चुकीचा असून काही ठराविक माणसं रोज खोटं बोलतात आणि पूर्वी झालेले बहुतेक संशोधन हे त्यांच्यावरच आधारीत होते.
प्लॉस वन या जर्नलमध्ये ब्रिआना यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनासाठी ब्रिआना यांनी सरासरी 39 वयोगटातील 194 जणांची निवड केली होती. यातील अर्धे पुरुष होते आणि अर्ध्या स्त्रिया होत्या. तुम्ही लोकांना फसवण्यात किती वाकबगार आहात ? दिवसातून किती वेळा खोटं बोलता ? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
सराईतपणे खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सत्य घटनांच्या अवतीभोवती लोकांना पटतील अशी कथा रचतात आणि खोटं बोलतात, यामुळे ते खोटं बोलतायत असं कळत नाही. खोटं बोलणारी बहुतांश मंडळी माणूस समोर असताना खोटं बोलणं पसंत करतात. मेसेवरून किंवा सोशल मीडियावर खोटं बोलणं ते टाळतात असंही ब्रिआना यांना दिसून आलं आहे. खोटं बोलणारी मंडळी सगळ्यात जास्त खोटं मित्रांसोबत किंवा सहकाऱ्यांसोबत बोलतात असंही संशोधनातून दिसून आलं आहे. शिक्षण आणि खोटं बोलणं याचा काहीही संबंध नसल्याचंही संशोधनातून दिसून आलं आहे.

























































