काय सांगता! बस,लोकल, मेट्रोमध्ये पुरुषांचाही लैंगिक छळ होतो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई, पुणे, बंगळुरू, नवी दिल्ली सारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आधार घेत प्रवास करणाऱ्या अनेक पुरुषांचा लैंगिक छळ होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विक्रम सिंह याने त्याच्यासोबत झालेला प्रकार जेव्हा त्याच्या मित्रांना सांगितला, तेव्हा ते सगळे जण जोरजोरात हसायला लागले. कमी अधिक प्रमाणात छळ होत असलेल्या प्रत्येक पुरुषाला हाच अनुभव आला आहे की जेव्हा ते ही गोष्ट त्यांच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगतात तेव्हा ते सगळा प्रकार हसण्यावारी नेतात.

विक्रम सिंह एक फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभा होता, त्याच्या मागे उभ्या असलेल्या एका म्हाताऱ्या माणसाने त्याला पाठून चिकटून उभं रहात त्याचं गुप्तांग विक्रमला घासण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला गर्दी असेल म्हणून विक्रमने दुर्लक्ष केलं मात्र तो म्हातारा मुद्दाम करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर विक्रमने त्याला जबरदस्त झापला. यावर तो म्हातारा ‘राहून दे की काय फरक पडतो’ असं निर्लज्ज उत्तर देऊन तसाच उभा होता. उत्तर प्रदेशातील कपिल शर्मा याने लखनऊला गेलेला असतानाचा प्रकार सांगितला. बसमध्ये एका माणसाने त्याला बसायला जागा दिली. कपिल आनंदाने बसला खरा मात्र त्या माणसाने कपिल बसताच त्याच्या गुप्तांगाला हात लावायला सुरुवात केली. सुरुवातीला हे गर्दीमुळे होत असेल असं कपिलला वाटलं होतं. मात्र नंतर त्याला कळालं की तो माणूस हे मुद्दाम करतोय. मुंबईमध्येही अनेक पुरुषांना अशाच प्रकारांचा सामना करावा लागला आहे.

बीबीसी हिंदीने अशा पद्धतीने पुरुषांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबत वृत्त दिलं आहे, ज्यात त्यांनी मानसोपचारतज्ञ प्रवीण त्रिपाठी यांचा हवाला देत म्हटलंय की अनेकदा पुरुष लाजेखातर या गोष्टींवर बोलत नाही. पुरुषांची प्रतिमा ही कणखर, रफटफ, न रडणारा अशी असल्याने ते घाबरले तरी कोणाला सहसा या गोष्टी सांगत नाही असं त्रिपाठी यांनी म्हटले आहे.