स्वच्छतादूत असणाऱ्य़ा मनोरुग्णांना राजरत्नने दिला मायेचा हात, संगमेश्वरमधून दोन मनोरुग्ण घेतले ताब्यात

ऊन, वारा, पाऊस आणि थंडी या कशाचीही तमा न बाळगता गेली सहा वर्षे संगमेश्वर आणि माभळे परिसरात महामार्गाच्या बाजूला असणारा कचरा एकत्र करून परिसराची स्वच्छता करणाऱ्य़ा एका वयोवृद्ध मनोरुग्णाला आणि महामार्गावर टाकल्या जाणाऱ्य़ा रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करून जणू  ‘पर्यावरण वाचवा’  असा संदेश देणाऱ्य़ा मनोरुग्ण महिलेला रत्नागिरी येथील राजरत्न प्रतिष्ठानने संगमेश्वर येथे येऊन ताब्यात घेतले आणि त्यांना मायेचा हात देत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मनोरुग्णालयात भरती केले.

संगमेश्वरनजीकच्या माभळे येथे एक महिला महामार्गालगत स्वतःचे जेवण करून जेवते. ‘या मनोरुग्ण महिलेला पुढील दोन दिवसांत होणाऱ्य़ा अतिवृष्टीत धोका निर्माण होऊ शकतो’ अशा आशयाची एक पोस्ट छायाचित्रासह रामपेठ संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल शेटय़े यांनी सोशल मीडियावर केली होती. ही पोस्ट माभळे पुनर्वसन येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अमित सामंत यांनी पाहिली आणि त्यांनी लगेचच मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्य़ा रत्नागिरीच्या ‘राजरत्न प्रतिष्ठान’ या संस्थेच्या सचिन शिंदे यांच्याजवळ संपर्क साधला.  शिंदे यांनी आपल्या टीमसह संगमेश्वर येथे येऊन या महिलेला तसेच सहा वर्षांपूर्वी संगमेश्वरमध्ये आलेले वयोवृद्ध मनोरुग्ण राजाभाऊ यांना ताब्यात घेतले. ‘राजरत्न’ने आजवर ताब्यात घेऊन उपचारासाठी दाखल केलेल्या मनोरुग्णांची संख्या आता 99 झाली आहे.

साधारण 40 वर्षे वयाची एक महिला संगमेश्वरमध्ये चार महिन्यांपूर्वी दाखल झाली. आल्यापासून ती महामार्गाच्या दुतर्फा टाकून दिलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्याचे काम करत होती. यासाठी ती माभळे येथून रत्नागिरीच्या दिशेने बावनदीपर्यंत तर चिपळूणच्या दिशेने सावडर्य़ापर्यंत जाऊन प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोणपाटात भरून आणायची. मनोरुग्ण असूनही ती पर्यावरण वाचवण्याचा संदेश आपल्या कामातून देत होती. एकत्र केलेल्या सर्व बाटल्या ती भंगारात विकून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती.

आज ‘राजरत्न’चे सचिन शिंदे आपले सहकारी सौरभ मुळ्ये, जया डावर यांच्यासह यांनी या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमित सामंत, अमोल शेटय़े, अविनाश सप्रे, दीपक भोसले, उद्योजक दीपक भिडे, साधना बेंडके, प्रशांत दळी, किशोर प्रसादे आदी उपस्थित होते. ‘राजरत्न प्रतिष्ठान’चे हे कार्य पाहून उद्योजक दीपक भिडे यांनी ‘राजरत्न’च्या सचिन शिंदे यांच्याकडे 5125 रुपयांची रोख मदत सुपूर्द केली.

बेंडके यांना अश्रू अनावर

ज्यांचे राजाभाऊ असे नामकरण झाले त्या वृद्ध मनोरुग्णाला घरच्या माणसाप्रमाणे माभळे येथील हॉटेल चालिका साधना बेंडके या गेली सहा वर्षे दररोज न चुकता चहा-नाश्ता देत होत्या, त्यांच्याशी संवाद साधत होत्या. महिला मनोरुग्णदेखील बेंडके यांच्या हॉटेलसमोर असल्याने गेल्या चार महिन्यांत तीदेखील त्यांच्याजवळ एका अनामिक नात्याने जोडली गेली होती.  आज ‘राजरत्न’ने दोघांनाही मनोरुग्णालयात भरती करण्यासाठी गाडीत बसविल्यानंतर साधना बेंडके यांना अश्रू अनावर झाले. सचिन शिंदे यांनी बेंडके यांना धीर देऊन दोघांचीही काळजी करू नका, त्यांना त्यांचे नातलग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

आपली प्रतिक्रिया द्या