#mentoo-‘या’ बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्रीने दिला करण ओबेरॉयला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अभिनेता करण ओबेरॉयला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्याची अनेक मित्रमंडळी पुढे आली आहे. यामध्ये  90च्या दशकातील एका बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्रीचाही समावेश आहे. या अभिनेत्रीने करण निर्दोष असल्याचा दावा केला असून जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत महिलेप्रमाणेच पुरुषाचीही ओळख जगजाहीर केली जाऊ नये अशी मागणी केली आहे.

अभिनेत्री पूजा बेदी ही करणची चांगली मैत्रिण असून तिला करणच्या अटकेबद्दल कळालं तेव्हा तिला धक्का बसला होता. तिच्याप्रमाणेच करणच्या इतर मित्रांनाही धक्का बसला. करणच्या मित्रांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी करणवर लावण्यात आलेले आरोप खोटे असून काही महिला फक्त कायद्याचा गैरवापर पुरूषांचं आयुष्य उद्धवस्तकरण्यासाठीच करत आहेत असा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.

 pooja-bedi

करणच्या समर्थनार्थ त्याच्या बँड ऑफ बॉईज या टीममधील कलाकारांनी व मित्रांनी पूजा बेदी हीच्या घरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी करण आपला जवळचा मित्र असून गेली 20 वर्ष आमची मैत्री आहे. त्याचे वडील निवृत्त लष्कर अधिकारी असून कडक शिस्तीत वाढलेला करण असे कृत्य करुच शकत नाही असा दावा करणचा जवळचा मित्र व अभिनेता सुधांशू पांडे याने केला.

तसेच अशा आरोपांमुळे पुरुषांचेही करिअर व प्रतिष्ठा पणाला लागते. त्याच्या कुटुंबावरही आघात होतो. अनेकवेळा त्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. असे सांगत पूजा बेदी हिने पुरुषांच्या हक्कासाठी लढण्याची ही वेळ असल्याचे म्हटले. आतापर्यंत स्त्रियांच्या हक्कासाठी मी लढत होते. पण आता पुरुषांच्या हक्कासाठीही मी लढणार असल्याचं पूजा बेदीने सांगितले. #metoo चळवळीप्रमाणे ही #mentoo ची सुरुवात असल्याचेही पूजाने म्हटले आहे.

करणवर त्याच्या ज्योतिषी असलेल्या मैत्रिणीने बलात्कार व ब्लॅकमेलिंगचा आरोप लावला आहे. करण व तिची मैत्री एक डेटींग अॅपवर 2016 साली झाली होती. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करायचे ठरवले होते असं सांगितलं जातं. एके दिवशी करणने आपल्याला घरी बोलावले व नारळ पाण्यातून गुंगीचे औषध दिले असा आरोप पीडितेने केला आहे. पाणी प्यायल्यानंतर माझी शुद्ध हरपली आणि याचा फायदा उचलत करणने माझ्यावर बलात्कार केला असं या महिलेने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. माझा व्हिडीओ काढून करणने मला वारंवार ब्लॅकमेल केलं असाही आरोप या महिलेने केला आहे.