
अँग्लो ईस्टर्न शिप मॅनेजमेंटच्या ईए जर्सी या जहाजावर कार्यरत असलेले मर्चंट नेव्ही कॅडेट सार्थक महापात्रा समुद्रातून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ते ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील केसपूर गावचे आहेत. ही घटना घडली तेव्हा जहाज पश्चिम आफ्रिकेहून सिंगापूरच्या दिशेने प्रवास करत होते. सार्थक हे अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 2 फेब्रुवारीला सार्थक यांनी आईशी व्हिडीओ कॉलद्वारे शेवटचा संवाद साधला होता त्यावेळी ते पूर्णपणे तंदुरुस्त आणि आनंदी दिसत होते. 3 फेब्रुवारीला सकाळी सवासहा वाजता ते केबिनच्या दिशेने जाताना दिसले होते. या प्रकरणाची माहिती मॉरिशस मेरीटाईम रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटरला देण्यात आली आहे. सार्थक हे त्यांची इंटर्नशिप पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात होते. दोन महिन्यांनंतर त्यांना थर्ड ऑफिसर म्हणून बढती मिळणार होती.


























































