अवघे जग ‘मेटा’कुटीला! फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंट्स लॉगआऊट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेसबुक आणि इन्स्टाग्राम सेवा आज अचानक बंद पडल्यामुळे अवघे जग अक्षरशः ‘मेटा’कुटीला आले होते. लॉगइनच होता येत नसल्यामुळे यूजर्सना त्यांचे रिल्स अपलोड करता आले नाहीत, संदेश पाठवता आले नाहीत. मोबाईलवरही एफबी पेज ओपन न होता लॉगइन विचारले जात होते आणि लॉगइन पासवर्ड दिल्यावरही फेसबुकचे पेज दिसत नसल्याने यूजर्स हैराण झाले. दीड तासानंतर ‘मेटा’च्या सर्व सेवा पूर्ववत झाल्या.

फेसबुक, इन्स्टा बंद पडले असले तरी आमचे सर्व्हर मात्र सुरू आहेत. त्यामुळे तुम्ही ही पोस्ट वाचत आहात, असा टोला एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे मालक एलॉन मस्क यांनी या गोंधळावरून ‘मेटा’ला लगावला. या बिघाडानंतर नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी वापरकर्त्यांनी एक्स वर शोधाशोध सुरू केली तेव्हा एक्सनेही, ‘तुम्ही सर्व आत्ता येथे का आहात हे आम्हाला माहित आहे’ असे म्हणत त्यांनी मिश्किल टिपणी केली.

तीन लाख पेजेस बंद
फेसबुकवर तीन लाखांपेक्षा अधिक पेजेस बंद होती तर, इन्स्टावर वीस हजार पेक्षा अधिक सेवा खंडीत झाल्या होत्या. फेसबुक खात्यातून लॉग आउट झालेल्या हजारो यूजरना या बिघाडामुळे पुन्हा लॉगइन होता येत नव्हते.

व्हॉट्सअॅप मात्र सुरू
‘मेटा’च्या मालकीच्या व्हॉट्सअॅप सेवेवर मात्र या गेंधळाचा कुठलाही परिणाम जाणवला नाही. साधारण दीड तास फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प होते. त्यानंतर सेवा सुरळीत सुरू झाली. या प्रकारावर ‘मेटा’ने दिलगिरी व्यक्त केली आहे.