राज्यावर अस्मानी संकट; 19 जिह्यांना अलर्ट, पाच दिवस सावधानतेचे…. गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा बसणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. पावसाचे हे ‘अस्मानी संकट’ पुढील पाच दिवसांत आणखी तीव्र बनणार असल्याचा सावधगिरीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर 19 जिह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर बहुतांश जिह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. यात शेतपिकाचे प्रचंड नुकसान होणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मागील दोन दिवस पुणे, नाशिक, धुळे, जळगावसह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यात शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून येत्या चार-पाच दिवसांत ‘अस्मानी संकट’ आणखी तीव्र बनणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 19 जिह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस थैमान घालणार आहे. सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच संपूर्ण मध्य महाराष्ट्र, संपूर्ण मराठवाडा तसेच मुंबईवगळता कोकण आणि विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, नागपूर व भंडारा जिह्याच्या विविध भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यभरात वादळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.

मुंबई परिसरात हलका पाऊस पडणार

हवामान खात्याने मुंबई महानगर क्षेत्रालाही ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. 1 व 2 एप्रिल या दोन दिवसांत मुंबई आणि लगतच्या जिह्यांमध्ये मान्सूनपूर्व सरी बरसण्याची शक्यता आहे. मुंबई व पालघर जिह्यात हलका पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा प्रभाव असेल. ठाणे आणि रायगड जिह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

विदर्भ ते दक्षिण हिंदुस्थानात कमी दाबाचा पट्टा

हवामान खात्याने पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ ते दक्षिण हिंदुस्थानपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभर पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या पाच दिवसांत विविध जिह्यांना पावसाचा तडाखा बसेल. त्यानंतरही काही दिवस पावसाचा जोर राहील. धाराशीव जिह्यात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहतील. अनेक जिह्यांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना तसेच काही ठिकाणी गारपीट होऊ शकते, असे हवामान खात्याने जाहीर केले.

जळगाव, नांदेडमध्ये शेतीचे मोठे नुकसान

मागील दोन दिवस धुमशान घातलेल्या अवकाळी पावसाने जळगाव आणि नांदेड जिह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. मका, ज्वारी, बाजरी तसेच कांदा बियाणे पिकांना पावसाचा फटका बसला. काढणीसाठी तयार झालेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरीवर्ग अक्षरशः कोलमडला आहे. पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.