
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि सुरक्षित अंतर राखण्यासाठी आता मेट्रोनेही शक्कल लढविली आहे. उद्या सोमवारपासून मेट्रोने फेऱयांत वाढ केली आहे. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मार्गावर सोमवारी 22 मार्चपासून 280 फेऱया वाढविण्यात येणार आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर मेट्रोमधून दर आठवडय़ाला एक लाखांवर प्रवासी प्रवास करीत आहेत. कोरोनापूर्व काळात साडेचार लाखांच्या तुलनेत सध्या 1.1 लाख प्रवासी मेट्रोतून प्रवास करत असून सध्या 256 मेट्रो फेऱया सुरू आहेत.
स्थानकांमध्ये हेल्थ डेस्क
वाढत्या प्रवासी संख्येमुळे सर्व मेट्रो स्थानकांत हेल्थ डेस्क उभारण्यात आले आहेत. येथे तापमान मोजण्याची सुविधा आणि प्रवाशांना सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येत आहे. मेट्रो स्थानके आणि मेट्रोमध्ये उद्घोषणेतून प्रवासात मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याचा संदेश देण्यात येत असल्याचे मेट्रो वन प्रशासनाकडून सांगण्यात आले.






























































