पालिका, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू होणार

2555

लॉकडाऊन खुले करण्याबाबत राज्य सरकार तत्कालीन स्थितीवरून निर्णय घेणार असले तरी पालिका आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असून पालिकेच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. मुंबईबाहेरील विरार, नालासोपारा, कल्याण, अंबरनाथवरून मुंबईत कामावर येणार्‍या कर्मचार्‍यांचे चार ते सहा तास प्रवासातच जात आहेत. या कर्मचार्‍यांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू झाल्यास त्यांचा वेळ वाचणार असल्याचे चहल म्हणाले.

कर्मचार्‍यांसाठी १०० टक्के हजेरीचा निर्णय घेतल्यामुळे पालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसह इतर सर्व कर्मचार्‍यांना कामावर यावे लागत आहे. मात्र यातील हजारो कर्मचारी हे मुंबईबाहेरून येत असल्यामुळे प्रवासातच त्यांचे पाच ते सहा तास जात आहेत. त्यामुळे पालिका आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत रेल्वे सुरू करावी आणि केवळ पालिकेची सेवा असणार्‍या ठिकाणीच थांबवावी याबाबत विचार सुरू असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले. या कर्मचार्‍यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मेट्रोदेखील सुरू केल्यास आणखी फायदा होणार आहे. याशिवाय पालिकेच्या बेस्ट उपक्रमातील बसही कर्मचार्‍यांना जास्त संख्ये उपलब्ध करून देता येतील असेही आयुक्त चहल म्हणाले. चौथ्या लॉकडाऊबाबत ३१ मे रोजी निर्णय समजणार असला तरी पालिकेच्या कर्मचार्‍यांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू केल्यास मोठा फायदा होणार असल्याचे आयुक्त म्हणाले.

असे सुरू आहे काम
– सध्या ७२ लॅबच्या माध्यमातून चाचण्या केल्या जात आहेत. या लॅबना स्वॅब घेतल्यानंतर दुसर्‍या दिवशी रिपोर्ट न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. क्षमतेपेक्षा जास्त सँपल घेऊ नये असे निर्देश लॅबना देण्यात आले आहेत.
– खासगी डॉक्टरांना दररोज दोन पीपीई किट पालिकेच्या माध्यमातून मोफत दिले जात आहेत. याशिवाय एक आठवड्याचा मोफत पीपीई किटचा स्टॉक देण्यात येत असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.
– पालिकेच्या माध्यमातून प्रतिदिवस ६०० डायलेसिस करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये ‘कोविड डायलेसि डॉट इन’ या ऑनलाइन पोर्टलवर माहिती मिळणार आहे.
– मुंबईतून आतापर्यंत ४.०६ लाख कामगार मुंबईबाहेर पाठवण्यात आले आहेत. त्यांना आवश्यक असणारे पास, त्यांच्या प्राथमिक चाचण्या पालिकेने मोफत केल्या आहेत. धारावीतूनच सुमारे ७० हजार कामगार मुंबईबाहेर गेले आहेत, अशी माहितीही आयुक्तांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या