
जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) रविवारी महिलांच्या सन्मानार्थ अनोखा उपक्रम राबवला. मेट्रो मार्गिका-3 अर्थात ‘अॅक्वा लाईन’वरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मरोळ नाका या दोन प्रमुख स्थानकांचे कामकाज पूर्णपणे महिला कर्मचाऱयांद्वारे हाताळण्यात आले. मेट्रो सेवेची जबाबदारी महिला कर्मचारी समर्थपणे पेलत असल्याचे पाहून मुंबईकरांनी त्यांचे काwतुक केले. अनेक प्रवाशांनी महिला कर्मचाऱयांना गुलाबाचे फुल दिले.
मेट्रो-3 या भुयारी मेट्रो मार्गिकेवरील प्रवासी सेवा विविध टप्प्यांत हाताळली जात आहे. स्थानक नियंत्रण, तिकीटिंग, प्रवासी सहाय्य, सुरक्षा, देखभाल आणि हाऊसकीपिंग अशा विविध टप्प्यांतील जबाबदाऱया सोमवारी संपूर्ण दिवसभर पूर्णपणे महिला कर्मचाऱयांनी सांभाळल्या. तीन शिफ्ट्समध्ये मिळून जवळपास 85 महिला कर्मचाऱयांनी मेट्रो स्थानकांचे कामकाज पाहिले. अॅक्वा लाईनवर 27 महिला मेट्रो पायलट नियमितपणे गाडय़ांचे संचालन करतात. एमएमआरसीमध्ये 1,388 महिला कर्मचारी कार्यरत आहेत. या ‘नारीशक्ती’चा सन्मान म्हणून एमएमआरसीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सीएसएमटी आणि मरोळ नाका या दोन मेट्रो स्थानकांची जबाबदारी पूर्णपणे महिला कर्मचाऱयांकडे सोपवली होती.


























































