
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबई शहरातील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींची अवस्था बिकट आहे. शंभर वर्षे ओलांडलेल्या काही इमारतींना ‘टेकू’चा आधार आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन रहावे लागते. जुन्या आणि जीर्ण झालेल्या या इमारतींचा लवकरच मेकओव्हर होणार आहे. त्यासाठी म्हाडा लवकरच ‘ऍक्शन प्लॅन’ तयार करणार आहे.
म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या 14 हजार 286 आहे. या इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीचे काम म्हाडा करते. पावसाळ्यात जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना सर्वाधिक घडतात. या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या मुंबई शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा अहवाल शिवसेना नेते, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी म्हाडाकडे मागवला होता. त्यानुसार मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर आणि म्हाडाचे निवासी कार्यकारी अभियंता अरविंद जोशी यांनी पालकमंत्र्यांकडे हा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, 1970 ते 2018 या कालावधीत पावसाळ्यात इमारती कोसळून आजवर 3528 अपघात झाले आहेत. यात 894 नागरिकांनी जीव गमवला आहे तर 1883 नागरिक जखमी झाले आहेत. गतवर्षी जुन्या इमारती कोसळण्याच्या 191 घटना घडल्या. यात 37 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत.
कामाठीपुरा येथील 125 इमारतींना ‘टेकू’चा आधार
मुंबई शहरात सर्वाधिक जुन्या आणि धोकादायक इमारती कामाठीपुरा परिसरात आहेत. कामाठीपुरा येथे 530 उपकरप्राप्त इमारती असून बहुतेक इमारती 100 वर्षे जुन्या आहेत. त्यापैकी 125 इमारतींना ‘टेकू’चा आधार आहे अशी माहिती म्हाडाने अहवालात दिली आहे.
जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे कुठल्याही नागरिकाचा मृत्यू होऊ नये यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. येणाऱ्या काळात या सर्व इमारती पुनर्रचित करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ‘ऍक्शन प्लॅन’ तयार करणार आहोत. त्यासाठी नियमांत आवश्यक ते बदल करण्यासाठी आम्हाला शासनाची मदत लागणार आहे. नियमांत आवश्यक ते बदल झाल्यास जुन्या इमारतींचा आम्ही मेकओव्हर करू! -विनोद घोसाळकर, सभापती, म्हाडा





























































