थेट म्हाडाच्या उपाध्यक्षांपुढे 22 जुलैला मांडा तक्रारी

लोकसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद असलेल्या म्हाडाच्या लोकशाही दिनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. म्हाडाचा लोकशाही दिन येत्या 22 जुलै रोजी ‘म्हाडा’च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात चौथ्या मजल्यावरील सभागृहात पार पडणार आहे. यानिमित्ताने रहिवाशांना आपल्या तक्रारी, समस्या थेट म्हाडाच्या उपाध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱयांसमोर मांडता येणार आहेत. ‘म्हाडा’च्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील सभागृहात ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली या वर्षी जानेवारीपासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱया सोमवारी म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. आतापर्यंत म्हाडामध्ये तीन लोकशाही दिन घेण्यात आले असून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, परंतु एप्रिल ते जून या महिन्यात आचारसंहितेमुळे लोकशाही दिन होऊ शकला नव्हता.