
मुंबईत जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींची समस्या गंभीर बनू लागली आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना महामंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी त्याची दखल घेत अशा इमारतींची युद्धपातळीवर पाहणी सुरू केली आहे. आज त्यांनी दक्षिण मुंबईतील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या धोकादायक इमारतींमधील नागरिकांना तातडीने संक्रमण शिबिरांमध्ये हलवण्यात यावेत असे आदेश त्यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना दिले.
दक्षिण मुंबईतील बी, सी, डी आणि ई वॉर्डांमधील 21 धोकादायक इमारतींची पाहणी विनोद घोसाळकर यांनी केली. शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्यासमवेत त्यांनी इमारतींमधील रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोणत्याही क्षणी दुर्घटनाग्रस्त होण्याच्या अवस्थेत असलेल्या या इमारतींमध्ये आम्ही जीव मुठीत धरून राहत आहोत, असे रहिवाशांनी सांगितले. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना तातडीने संक्रमण शिबिरांमध्ये गाळे उपलब्ध करून द्या, असे आदेश घोसाळकर यांनी यावेळी उपस्थित म्हाडा अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे आवश्यक असेल तिथे इमारतींची दुरुस्ती सुरू करा आणि अगदीच धोकादायक असतील त्या इमारती पाडण्याची कार्यवाही सुरू करा, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना खासदार अरविंद सावंत, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उपमुख्य अधिकारी क्षीरसागर, कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, शाखाप्रमुख बाळा अहिरेकर, वैभव मयेकर, शशी पवार, दिलीप सावंत, राजू फोडकर, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.

























































