
अभ्युदय नगर या म्हाडा वसाहतीचा रखडलेला समूह पुनर्विकास अखेर मार्गी लागणार आहे. राज्य सरकारने या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी एम. जी. एन. अॅग्रो प्रॉपर्टीज, एन. एन. पी. बिल्डकॉन आणि ओनेस्ट शेल्टर्स यांची बांधकाम व विकास कंपनी म्हणून नियुक्ती केली आहे. या विकासक कंपनीला म्हाडाने आज स्वीकृती पत्र दिले. पुनर्विकासात रहिवाशांना 210 चौरस फुटांच्या घराच्या मोबदल्यात 641 चौरस फुटांचे घर मिळणार आहे.
अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची जबाबदारी राज्य सरकारने म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सोपविली. म्हाडाने बांधकाम व विकास तत्त्वावर पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. म्हाडाने प्रसिद्ध केलेल्या निविदेला सात वेळा मुदतवाढ देऊनदेखील प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 11 एप्रिल 2025 रोजी स्थानिक लोकप्रतिनिधी, अभ्युदय नगर महासंघ यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत प्रकल्पाच्या निविदा अटींमध्ये बदल करून निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येकाला पार्पिंग, पाच लाख रुपये कॉर्पस फंड देणे, पंचवीस हजार रुपये भाडे आदी अटींचा त्यात समावेश केला.
3410 रहिवाशांचे होणार पुनर्वसन
अभ्युदय नगर म्हाडा वसाहत 1,33,593 चौरस मीटर म्हणजेच सुमारे 33 एकर जागेत वसलेली आहे. या वसाहतीत 48 इमारती असून त्यामध्ये 3335 घरांचा आणि 75 दुकानांचा समावेश आहे.
ओबेरॉय रिअल्टीची ऐनवेळी माघार
आर्थिक निविदेत ओबेरॉय रिअल्टीने बाजी मारली, मात्र या पंपनीने अचानक निविदेतून माघार घेतली. त्यामुळे म्हाडाने दुसऱया क्रमांकाच्या एम. जी. एन अॅग्रो प्रॉपर्टीज, एन. एन. पी बिल्डकॉन आणि ओनेस्ट शेल्टर्स यांनी संयुक्तरीत्या सादर केलेल्या निविदेला मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. त्यास नुकतीच मान्यता मिळाली. त्यानंतर ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी आज विकासक पंपनीला या प्रकल्पाकरिता स्वीकृती पत्र दिले.























































