
कोन पनवेलमधील 1309 यशस्वी गिरणी कामगारांनी अद्याप सोडतीमधील घरांचा ताबा घेतलेला नाही. महिन्याभरात या गिरणी कामगार किंवा वारसांनी आपल्या कागदपत्रांसहित म्हाडाकडे संपर्क साधावा, असा अल्टिमेटम म्हाडाने दिला आहे. दिलेल्या मुदतीत संपर्क न साधल्यास अशा गिरणी कामगारांना घरकुल योजनेत स्वारस्य नाही असे गृहित धरून त्यांना भविष्यात होणाऱया सोडतीतून वगळण्यात येईल, असा इशाराही म्हाडातर्फे देण्यात आला आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2016 मध्ये कोन पनवेल येथे गिरणी कामगारांसाठी 2417 घरांची लॉटरी काढण्यात आली होती; परंतु विविध कारणात्सव अजूनही 1309 गिरणी कामगारांनी घरांचा ताबा घेतलेला नाही. त्यामुळे ही घरे धूळ खात पडली आहेत. या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई मंडळाने गिरणी कामगारांना घराचा ताबा घेण्यासाठी महिन्याभराचा अल्टिमेटम दिला आहे. संबंधित 1309 विजेत्या गिरणी कामगारांची यादी म्हाडाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
– संबंधित गिरणी कामगार किंवा वारसांनी 7 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत आपल्या कागदपत्रांसहित म्हाडा मुख्यालयातील उपमुख्य अधिकारी, गिरणी कामगार मंडळ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा ज्यांना प्रत्यक्ष संपर्क साधणे शक्य नाही त्यांनी [email protected] या ईमेलवर अर्ज करावा, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.