
दक्षिण मुंबईसह उपनगरातील रहिवाशांना भेडसावणाऱया पुनर्विकासाच्या विविध प्रश्नावर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. रहिवाशांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या अडचणींचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन या बैठकीत म्हाडा उपाध्यक्षांनी दिले.
शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी आज म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची म्हाडा मुख्यालयात भेट घेतली. या बैठकीत दक्षिण मुंबईमधील मेट्रो प्रकल्पामुळे अपात्र ठरलेल्या 13 रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आणि पात्रतेचा प्रश्न तसेच दक्षिण मुंबई आणि उपनगरातील विविध पुनर्विकास प्रकल्पाबाबतही चर्चा करण्यात आली. यामध्ये जगन्नाथ चाळ (फणसवाडी झावबावाडी) बाळगोविंद चाळ (ग्रॅण्ट रोड), गिरगाव येथील पुंभारवाडा, भंडारा स्ट्रीट परिसरातील 13 इमारती, मेट्रो – 3 प्रकल्पामुळे गिरगावातील बाधित रहिवाशांचे प्रश्न आणि चारकोप येथील सत्संग सोसायटी या म्हाडा सोसायटय़ांमधील नागरिकांच्या पुनर्विकासासंदर्भातील समस्यांचा समावेश होता. यावेळी विभागप्रमुख संतोष शिंदे, भाडेकरू संघाचे मुकेश पेंडसे, शाखाप्रमुख बाळा अहिरेकर, वैभव मयेकर तसेच शिवसैनिक, स्थानिक नागरिक उपस्थित होते.


























































