
म्हाडाच्या प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य या योजनेतील घरांना अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. अवघ्या दोन दिवसांत 54 घरांची हातोहात विक्री झाली आहे. वडाळा ऍण्टॉप हिल येथील सर्वच्या सर्व 27 घरे विकली गेली आहेत. याशिवाय चारकोप, कांदिवलीतील घरांचीही विक्री झाली आहे.
दोन वेळा सोडतीत समावेश करूनही विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या ताडदेव, भायखळा, लोअर परळ, वडाळा, जुहू, कांदिवली, मालवणी येथील 118 घरांचा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत समावेश आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अनामत रक्कम भरण्याच्या प्रक्रियेला 17 फेब्रुवारीला तर सदनिका निश्चितीला 4 मार्चला सुरुवात झाली होती. लॉटरीशिवाय मुंबईत घराचे स्वप्न पहिल्यांदाच पूर्ण होणार असल्याने अर्जदारांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. अवघ्या दोन दिवसांत 54 घरांची निश्चिती झाली आहे. म्हणजेच या अर्जदारांनी 48 तासांच्या आत घराच्या विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम भरली आहे. रक्कम भरल्यानंतर अर्जदाराला म्हाडाकडून तात्पुरते देकार पत्र देण्यात येईल.
90 दिवसांत उर्वरित रक्कम भरावी लागणार
अर्जदाराला तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर 90 दिवसांच्या आत उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे. या कालावधीत रक्कम न भरल्यास आणखी 90 दिवसांची मुदतवाढ घेऊन व्याजासह रक्कम भरणे बंधनकारक आहे. तरीही पैसे न भरल्यास घराचे वितरण रद्द करण्यात येईल. तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर एखाद्या अर्जदाराने घर नाकारले तर घराच्या विक्री किमतीच्या 1 टक्के रक्कम वजा करून उर्वरित रक्कम अर्जदाराला परत करण्यात येईल.























































