महानंदमध्ये कमिशनचा वाद! एक रुपया वाढवून न दिल्यास वितरण बंद करण्याचा वितरकांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महानंद डेअरीत दूध वितरकांच्या कमिशनचा वाद उभा राहिला आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून डेअरीने वितरकांना प्रोत्साहन म्हणून कमिशनमध्ये एक रुपया वाढ दिली होती. मात्र वितरकांशी कोणतीही चर्चा न करता सदर कमिशन बुधवारपासून डेअरीने अचानक बंद केले आहे. ते डेअरीने तत्काळ सुरू करावे अन्यथा 25 ऑगस्टच्यामध्य रात्रीपासून वितरणासाठी दूध न उचलण्याचा इशारा वितरकांनी दिला आहे.

महानंद डेअरीकडून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सुमारे सवा लाख लिटर दुधाचे वितरण करते. त्यासाठी दूध वितरकांना प्रति लिटरमागे 4 रुपये 60 पैसे कमिशन दिले जात होते. मात्र कोरोना संकटकाळात दुधाच्या विक्रीत घट होऊ नये म्हणून मुख्य वितरकांना 50 पैसे तर उपविक्रेत्यांना 50 पैसे असे एकूण एक रुपया प्रोत्साहन म्हणून कमिशन चालू केले होते. मात्र 19 ऑगस्टपासून अचानक एक रुपया बंद केला आहे. सध्या महानंदच्या दुधाचे कमी वितरण असल्याने वितरण खर्च परवडत नाही. त्यामुळे प्रशासनाने बंद केलेले कमिशन तत्काळ सुरू करावे अन्यथा वितरणासाठी दूध उचलणार नाही असा इशारा महानंद दूध वितरक आणि वाहतूकदार संघाने दिला आहे.