
‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात आणि सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल, खोक्यांची मुक्त उधळण करत रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला.
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी यांच्या घरून वाजतगाजत रथामध्ये बसविण्यात आल्या. रथामध्ये उत्सवमूर्ती बसविल्यानंतर दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी रथोत्सवाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा आहे. अनेक ठिकाणांहून आलेल्या मानाच्या सासनकाठ्या रथास भेटविण्यात आल्या.
‘श्रीं’चा विवाह सोहळा एक महिनाभर चालतो. दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना आणि हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर तुळशीविवाह, श्री सिद्धनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होऊन शुक्रवार, दि.21 नोव्हेंबर रोजी लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव संपन्न झाला.
रथ नगरप्रदक्षिणेला पूर्वीप्रमाणे माणगंगा नदीपात्रातून जाण्याऐवजी नदीत पाणी असल्याने बायपास मार्गे नगरपालिका विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, महात्मा फुले चौक ते बसस्थानक या मार्गे सुरुवात झाली. भाविकांनी ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात रथावर गुलाल व खोबऱ्यांची उधळण केली. तसेच अनेक भक्तांनी निशाने, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे ‘श्रीं’ना अर्पण केली. अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली होती. रथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाल्यानंतर उजवी प्रदक्षिणा घालून रथ पारंपरिक पध्दतीने नदीपात्रालगत बायपास रस्त्यावरून ओढत आणला. तेथून पुढे श्री सिद्धनाथ यांच्या बहिणीस मानकऱ्यांच्या हस्ते साडी-चोळीचा आहेर करण्यात आला. याच ठिकाणी नवस फेडण्यात आले. त्यानंतर रथ वडजाई ओढ्यातून पुढे कन्या विद्यालयाच्या पुढे लक्ष्मीआई, मरीआई मंदिर मार्गावरून रथाने नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.
भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळातर्फे कराड, वडूज, अकलूज, विटा, सातारा, मेढा, सोलापूर, पंढरपूर, आटपाडी आदी आगारांनी एसटीच्या जादा बसेस सोडल्या होत्या. म्हसवड पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता.अजितराव राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, अॅड. पृथ्वीराज राजेमाने, सयाजीराव राजेमाने, गणपतराव राजेमाने, तेजसिंह राजेमाने, शहाजीराजे राजेमाने, अॅड. विश्वजित राजेमाने, मंत्री जयकुमार गोरे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, अभय जगताप, अनिल देसाई, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी रणजीत सावंत, तहसीलदार विकास अहिर, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रथोत्सव पार पडला.
‘श्रीं’च्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा
रथयात्रेनिमित्त मंदिरात ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासूनच दर्शनबारीत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. रिंगावण पेठ मैदानात यात्रा भरली आहे. यात्रेत खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी होती. उंच व गोलाकार फिरणारे यांत्रिक पाळणे, मौतका कुँवा, नाना-नानी पार्क आदी खेळांच्या साधनांकडे बालगोपाळांची मोठी गर्दी होती. विविध मिठाई विक्रेते, खेळणी व इतर साहित्य विक्रेत्यांचीही दुकाने भाविकांच्या गर्दनि फुलून गेली होती.





























































