छंदांतून ओळख गवसली

64

>> अनुराधा आंगणे, लालबाग

माझे बालपण लालबागसारख्या गिरणी कामगारांच्या वस्तीत एकत्र कुटुंबात गेले. कुटुंबात 35 ते 40 माणसांचा राबता होता. वडील मिल कामगार असल्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे मला शिक्षणाची आवड असूनही केवळ इयत्ता 7वीपर्यंत शिक्षण घेता आले. त्यात माझी आजी जुन्या वळणाची होती. त्यामुळे वडिलांनी आईचा आदेश शिरसावंद्य मानून माझे लग्न विश्वनाथ आंगणे यांच्याशी लावून दिले. माझे यजमान आंगणे यांनी माझ्या उपजत शिवणकाम, भरतकाम, विणकामात मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. त्यामुळे मला बळ मिळत गेले.

वाचन, मनन, चिंतन आणि अनुकरणाने माझ्या हातातील भरतकाम, शिवणकाम बहरत गेले. भरतकाम, विणकाम, शिवणकाम माझा आवडता छंद बनला. मी आजवर अनेक दरवाजावरील तोरणे तसेच गणेशमूर्ती तयार केलेल्या आहेत. आज माझे वय 77 वर्षे आहे. या वयातही मी माझा छंद जोपासत आहे. त्याचा आनंद अगदी मनमुरादपणे लुटत आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यातही माझा सहभाग आवर्जून असतो. या वर्षात मी बॉलवर विणकाम करून श्रीगणेश साकारला आहे. त्या गणरायाने माझ्या हाताला बळ देऊन माझा संसार सुखी ठेवावा एवढी मनोकामना मी वेगळी या सदराद्वारे करते.

प्रत्येकीचं स्वतःचं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या साऱ्यांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमचे वेगळेपण फोटोसहित आम्हालाही कळवा. वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल.

आमचा पत्ता ः श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या