तामीळनाडूत मिचाँग वादळाने हाहाकार, चेन्नईत महापूर; सहा जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिचाँग चक्रीवादळाचा तडाखा तामीळनाडूला बसला असून, मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे चेन्नईसह अनेक जिह्यांत हाहाकार उडाला आहे. पाणी शिरल्याने चेन्नईच्या रस्त्यांवर तरंगणाऱ्या गाडय़ा आणि काही ठिकाणी मगरीही दिसल्याने खळबळ उडाली. चेन्नई विमानतळावर पाण्याचे लोंढे वाहत असून, 70 वर विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. रेल्वे सेवा, बस वाहतुक ठप्प आहे. वीजपुरवठाही बंद असल्याने जनजीवन ठप्प झाले आहे.

बंगालच्या उपसागरावर तयार झालेले मिचाँग चक्रीवादळ उद्या (दि. 5) तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र किनाऱ्यावर धडक देईल. तत्पूर्वीच सोमवारी पहाटेपासून तामीळनाडूच्या किनाऱ्यावर ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपूरम, नागापट्टिनम, कडुलोर, तिरुवल्लूर जिह्यात वादळ वारा आणि पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

सर्वत्र पाणी… नागरिक भयभीत

  • वादळ वारे आणि मुसळधार पावसामुळे चेन्नईत सर्वत्र तीन ते चार फूट पाण्याचे लोंढे वाहत आहेत.
  • अनेक घरांमध्ये पाणी शिरले. रस्त्यांवर बोटींमधून नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविले जात आहे. एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.
  • चेन्नईत घराची भिंत कोसळून आणि झाडे उन्मळून पडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याचे वृत्त आहे.
  • रस्त्यांवर गाडय़ा तरंगत असून, काही भागात मगरीही आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
  • शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
  • चेन्नई विमानतळावर पुराचे पाणी घुसले. त्यामुळे विमानतळ बंद करण्यात आले. 70 विमानांचे उड्डाण रद्द केले आहे.
  • तामीळनाडूत 204 रेल्वे रद्द केल्या आहेत. बस वाहतूक ठप्प आहे.

2015ची पुनरावृत्ती

4 डिसेंबर 2015ला चक्रीवादळाने चेन्नईसह तामीळनाडूच्या सागरी किनारपट्टीवर हाहाकार माजवला होता. मोठी हानी झाली होती. आठ वर्षांनंतर आलेल्या मिचाँग चक्रीवादळाने याची पुनरावृत्ती झाली आहे.

चार राज्यांसाठी रेड अलर्ट

बंगालच्या उपसागरात तयार झालेले मिचाँग चक्रीवादळ उद्या दुपारी आंध्र प्रदेश किनारपट्टीलगत धडकेल. नेल्लोर आणि  मछलीपट्टण दरम्यान वादळाच्या वाऱ्याचा वेग ताशी 90 किमी असण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात सोमवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भागातील जनजीवन ठप्प झाले आहे. दरम्यान, तामीळनाडू, आंध्र प्रदेशसह पुद्दूचेरी आणि तेलंगणासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच ओडिशासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.