
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
सध्या स्मार्टफोनचा जमाना सुरू आहे. हा स्मार्टपणा अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रात आलाय, तसा तो अर्थातच खेळातही आलाय. क्रिकेटमध्येही अनेक तांत्रिक बदल होताना आपण बघतोय. यष्टय़ांमध्ये मायक्रोन आला, हेल्मेट अधिक अद्यावत होत गेले, सेंसॉरवाल्या बॅटीही आल्या. आता क्रिकेटचा चेंडूही स्मार्ट होणार आहे.
क्रिकेटच्या चेंडूत आता मायक्रोचीप बसवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत या नव्या चेंडूची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास हा चेंडू कसोटी क्रिकेटमध्ये वापरला जाण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातील क्रिकेटचे चेंडू बनवणाऱ्या प्रसिद्ध कुकाबरा कंपनीने मायक्रोचीप असणारा हा चेंडू तयार केला आहे. टी-20 क्रिकेटच्या जमान्यात तर हा चेंडू फारच फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
या मायक्रोचीप बसविलेल्या चेंडूला ‘स्मार्ट बॉल’ असे नाव देण्यात आले आहे. या ‘स्मार्ट बॉल’मुळे क्रिकेटमध्ये अधिक अचूकता येणार आहे. मायक्रोचीप बसल्यामुळे चेंडूची गती, उसळी घेण्यापूर्वीची दिशा आणि उसळी घेतल्यानंतरची दिशा याची लगेच नोंद होणार आहे. याचबरोबर फिरकी गोलंदाजांच्या फिरकीचे मोजमापदेखील करता येणे शक्य होणार आहे. याशिवाय, पंचांना अनेकदा ‘डीआरएस’ प्रक्रियेतील निर्णयावरून टीकेचे धनी व्हावे लागते. त्यातूनही त्यांची सुटका होण्याची शक्यता बळावली आहे.































































