
आयटी इंडस्ट्रीमधील दिग्गज म्हणवणाऱ्या मायक्रोसाॅफ्टने 6,800 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने जगभरातील त्यांच्या 3% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जून 2024 पर्यंत कंपनीत सुमारे 2 लाख 28 हजार कर्मचारी कार्यरत होते. याचा अर्थ आता सुमारे 6,800 कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या गमावतील.
मायक्रोसॉफ्टने 2023 मध्ये 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. कंपनीचे म्हणणे आहे की, ही कपात कंपनीच्या संघटनात्मक बाबींना नजरेसमोर धरुन निर्णय घेण्यात आलेला आहे. मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, “कंपनीला हे बदल खूप गरजेचे असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
जानेवारी 2023 मध्ये कंपनीने केलेल्या कपातीमुळे होलोलेन्स आणि इतर हार्डवेअर डिपार्टमेंट प्रभावित झाले होते. सध्याची कपात अशा वेळी झाली आहे की, याघडीला मायक्रोसॉफ्ट आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. कंपनीने या आर्थिक वर्षात अझ्युर आणि एआय-सेवा मजबूत करण्यासाठी $80 अब्ज खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कर्मचाऱ्यांच्या कपातीची बातमी आल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे शेअर्स $449.26 वर पोहोचले. या वर्षीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. जुलै 2023 मध्ये, कंपनीचा स्टॉक विक्रमी $467.56 वर पोहोचला होता.
मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे की, यावेळी कर्मचाऱ्यांची कपात कामगिरीवर आधारित नाही. याचा अर्थ असा की जे लोक त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत त्यांना त्यांच्या खराब कामगिरीमुळे डच्चु मिळत नाहीये. विशेष म्हणजे एप्रिल 2024 मध्ये मायक्रोसॉफ्टने तिमाही निकालांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. तरीही, ले आॅफवरुन असे दिसून येते की, मायक्रोसॉफ्टला त्यांच्या संसाधनांचा अधिक कार्यक्षमतेने वापर करायचा आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या कपातीची मालिका सुरूच आहे. मेटाने या वर्षी कामगिरीवर आधारित कमतरतेमुळे 5% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. तर सेल्सफोर्सने 1,000 हून अधिक पदे रिक्त केली. सध्याच्या घडीला या दोन्ही कंपन्या एआय-केंद्रित धोरणाकडे वाटचाल करत आहेत.