
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
शालेय पोषण आहाराच्या निकृष्ट धाव्याचे प्रकरण सध्या पेटले आहे. निकृष्ट धान्याच्या विरोधात शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. पोषण आहार पुरवठा करणार्या ठेकेदाराचा एक वर्षाचा ठेका संपला असून, यापुढे तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात वेगळा ठेकेदार नेमून त्यामार्फत पोषण आहार वितरीत करण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी पत्रकारांवर सांगितले. तसेच निकृष्ट पोषण आहार पुरवणार्या ठेकेदारावरील कारवाईचा निर्णय दोन दिवसात घेण्यात येणार असल्याचा इशारा बेटकर यांनी दिला.
शिक्षण सभापतींना अंधारात ठेवून शालेय पोषण आहाराच्या गोदामचे सील काढलं
रत्नागिरीत जिल्ह्यातील संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यासाठी पोषण आहार पुरवणार्या ठेकेदाराने निकृष्ट पोषण आहार पुरवल्याचे उघडकीस आल्यानंतर पोषण आहार धान्याच्या गोडावूनला पंचायत समिती सभापती विभांजली पाटील यांच्यासह सदस्य आणि जि. प. च्या संबंधित लेखाधिकाऱ्यांनी सील ठोकले होते.त्यावेळी शिक्षण समितीच्या सभेत त्या ठेकेदाराचे बील देऊ नये, असा ठराव करण्यात आला होता. मात्र, गोदामाला लावलेले सील काढताना सभापती सहदेव बेटकर यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. या प्रकाराबदृल बेटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर पोषण आहाराचा मुद्दा शिवसेना उपनेते आणि म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांच्यासमोर मांडण्यात आला. आ. सामंत आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी याबाबत परजिल्ह्यातील ठेकेदार न नेमता तालुक्यात गटनिहाय ठेकेदार नेमावेत, या बाबत शिक्षण सभापतींसोबत चर्चा केली. निकृष्ट पोषण आहाराबाबत बेटकर यांच्याकडे 15 शाळांमधून तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या ठेकेदाराचा ठेका रद्द करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गटनिहाय पोषण आहाराचे वितरण करून तेथील महिला बचतगटांकडून तो शिजवून घेऊन विद्यार्थ्यांना देण्याबाबत विचार सुरू असल्याचेही बेटकर यांनी सांगितले.
वांद्रीत डाळ शिजेना
सोमवारी शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी वांद्री शाळा क्र. 1 ला भेट दिली.त्यावेळी आणखा एक धक्कादायक प्रकार पुढे आल्याचे बेटकर यांनी सांगितले.त्या शाळेत पुरवण्यात आलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आढळून आला. डाळ शिजत नव्हती. मसालेही दर्जाहीन असल्याचे बेटकर यांनी सांगितले.






























































