शिक्षण सभापतींना अंधारात ठेवून शालेय पोषण आहाराच्या गोदामचे सील काढलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

शालेय पोषण आहारात निकृष्ट धान्य सापडल्यामुळे रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत हाहाःकार उडाला होता. तात्काळ धान्याच्या गोदामाला भेट देऊन सील ठोकण्यात आले होते.तिककीच तत्परता गोदामाचे सील काढण्यात दाखविण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.शिक्षण सभापती सहदेव बेटकरही अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.

शालेय पोषण आहारात निकृष्ट धान्य सापडल्यामुळे सभापती विभांजली पाटील यांच्यासह अनेक सदस्य आक्रमक झाले.पंचायत समितीच्या मासिक सभेत आवाज उठविल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली.पत्रकार परिषदेनंतर हे सर्व सदस्य जिल्हापरिषदेच्या शिक्षण समितीत घुसले आणि निकृष्ट पोषण आहाराबाबत आवाज उठविला.भर सभा थांबवून शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी विषयाकडे गांर्भियाने लक्ष देऊन संबधित अधिकाऱ्यांना जाब विचारला तेव्हा गोदामाला सील ठोकून ठेकेदाराला बोलावण्याचे ठरले.पुढच्या तासाभरात गोदामाला सील ठोकण्यात आले.

शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी पत्रकारांना सांगितले की, गोदामाचे सील कधी उघडले याची मला साधी कल्पना देण्यात आली नाही.निकृष्ट पोषण आहार सापडला तेव्हा सर्वांनी खूप गांभिर्याने घेतले होते.पण त्यानंतर गोदामाचे सील उघडताना संबधित अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला कल्पना दिली नाही.भविष्यात पोषण आहरात काय बरं वाईट घडलं तर सील उघडून देणारे जबाबदार रहाणार काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.