
अमेरिका आणि इराणमधील तणाव सध्या शिगेला पोहचला आहे. अमेरिका इराणला इशारे आणि धमक्या देत आहे. तर इराणही मागे हटायला तयार नाही. त्यामुळे दोन्ही देशात कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीत इराणवरील दबाव वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी अनेक विमानवाहू जहाजे आणि युद्धनौका आखाती देशात रवाना केल्या आहेत. इराणवर दबाव वाढवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असला तरी अमेरिकन विमानवाहू युद्धनौका यूएसएस जेराल्ड फोर्डवरील नौसैनिक परिस्थितीने त्रस्त आहेत. ट्रम्प यांच्या अडेलतट्टूपणामुळे आमचे जीवनच उद्ध्वस्त झालंय, आम्ही आता नौसेना सोडण्याच्या विचारात आहोत, असे अनेक सैनिकांनी सांगितले. त्यामुळए ऐन युद्धपरिस्थितीत अमेरिकेसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
इराणवरील दबावादरम्यान अमेरिकन विमानवाहू युद्धनौका यूएसएस जेराल्ड फोर्ड मध्य पूर्वेत पाठवण्यात आली आहे. हे इराणला घाबरवण्यासाठी आहे. परंतु ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेचेच सैनिक त्रस्त असल्याचे दिसून येते. अनेकांना पुन्हा तैनातीची चिंता आहे आणि ते नौदल सोडण्याचा विचार करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कठोर भूमिका घेत जगाला त्यांच्या ताकदीचा संदेश देऊ इच्छितात. मात्र, यूएसएस जेराल्ड फोर्ड त्यांचे सैनिक गंभीर संकटात आहेत. यूएसएस जेराल्ड आर. द फोर्ड गेल्या आठ महिन्यांपासून सतत तैनात आहे आणि आता त्याची तैनाती पुन्हा वाढविण्यात आली आहे. यामुळे जहाजावर तैनात असलेल्या हजारो सैनिकांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर प्रचंड दबाव येत आहे. कुटुंबियांपासून दीर्घकाळ वेगळे राहण्याने सैनिकांची मनस्थिती खालवली आहे. गेल्या वर्षी जूनपासून विमानवाहू जहाज समुद्रात आहे. प्रथम ते भूमध्य समुद्रात पाठवण्यात आले, नंतर कॅरिबियनमधील मोहिमेसाठी वळवण्यात आले. नंतर, ते पुन्हा अटलांटिक ओलांडून मध्य पूर्वेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले. इराणवर दबाव टाकण्यासाठी ही तैनाती करण्यात आली.
वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, विमानवाहू जहाजासाठी सामान्य शांतताकालीन तैनाती सुमारे सहा महिने असते. तथापि, फोर्डचे सैनिक आधीच आठ महिन्यांपासून घरापासून दूर आहेत आणि आता हा कालावधी 11 महिन्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकन नौदलाच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ सतत तैनातीचा विक्रम मोडू शकतो. अहवालानुसार, जहाजावर तैनात असलेल्या अनेक सैनिकांना मानसिक आणि भावनिक ताण येत असल्याचे सांगण्यात आले. एका महिला सैनिकाने सांगितले की ती जवळजवळ एक वर्षापासून तिच्या लहान मुलीपासून दूर आहे आणि आता ती नौदल सोडण्याचा विचार करत आहे. अनेक सैनिकांना कौटुंबिक विवाह, वाढदिवस आणि इतर महत्त्वाचे प्रसंगी उपस्थित राहता आले नाही.
जहाजाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन डेव्हिड स्कारोसी यांनी कबूल केले की वाढीव तैनातीमुळे जहाजावरील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी एका पत्रात लिहिले की त्यांना स्वतः लवकरच घरी परतण्याची आशा होती. परंतु त्यांनी असेही म्हटले आहे की, जेव्हा राष्ट्राला गरज असेल तेव्हा आपण सज्ज असले पाहिजे. या जहाजावर जवळजवळ ५,००० सैनिक तैनात आहेत. त्यापैकी बरेच जण २० ते २५ वयोगटातील तरुण आहेत, जे इतक्या काळापासून घरापासून दूर आहेत.
दीर्घ तैनातीचे परिणाम जहाजावर देखील दिसून येत आहेत. जहाजाच्या सांडपाणी व्यवस्थेत समस्या आल्या आणि अनेक शौचालये काम करत नव्हती, ज्यामुळे सैनिकांना वाट पाहावी लागली. संपूर्ण जहाजात व्हॅक्यूम तंत्रज्ञानाचा वापर करून चालणारी ६५० शौचालये आहेत. तथापि, नौदलाचे म्हणणे आहे की समस्या नियंत्रणात आहे आणि त्याचा मोहिमेवर परिणाम झाला नाही. काही कुटुंबांनीही त्यांचे दुःख व्यक्त केले आहे. तसेच आमचे जीवनच उद्ध्वस्त झालंय, अशा शब्दांत अनेक नौसैनिकांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे.






























































