
आखाती देशांमधील तणाव आता एका अत्यंत विनाशकारी वळणावर पोहोचला असून रविवारी सकाळी अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याने इराणवर मोठा लष्करी हल्ला चढवला. इराणच्या मोक्याच्या समजल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळील ‘बंदर खमीर’ या शहरातील जेट्टीवर हा हल्ला करण्यात आला. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा हल्ला इतका भीषण होता की याचे पडसाद इराणच्या राजधानीतही उमटले. तेहरानमध्ये प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आल्यानंतर काही तासांतच इराणच्या विविध भागांत हल्ल्यांची दुसरी लाट सुरू झाल्याचे इस्रायली लष्कराने स्पष्ट केले. या कारवाईबाबत इस्रायली संरक्षण दलाने (IDF) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी दावा केला आहे की, इस्रायली हवाई दलाने इराणमधील शस्त्रसाठा, शस्त्र उत्पादन केंद्रे आणि हवाई संरक्षण प्रणालींना प्रामुख्याने लक्ष्य केले आहे. या लष्करी कारवाईमुळे संपूर्ण आखाती प्रदेशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे.
























































