युतीबिती विसरून जा… स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा ! सरनाईकांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण व ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकलेला असतानाच आता मिंधे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघावरही डोळा ठेवला आहे. युतीबिती विसरून जा… स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा, असे भाजपच्या प्रभारींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हवाला देत घोषणाच करून टाकली आहे. त्यामुळे मिंधे गटामध्ये अस्वस्थता पसरली असून आपल्या हातून हा मतदारसंघ जाणार तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

डोंबिवलीमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात आम्ही कोणत्याही परिस्थितीत विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. एवढेच नव्हे तर तसा ठरावदेखिल सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर ठाण्यात झालेल्या मेळाव्यात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी कल्याणबरोबरच ठाणेही आमचेच असल्याचे ठामपणे सांगून टाकले. त्यामुळे कल्याण व ठाण्यात मिंधे गट व भाजप नेते यांच्यात बेबनाव निर्माण झाला. कल्याण व ठाणे लोकसभा मतदारसंघाची एकीकडे ही परिस्थिती असतानाच मीरा रोड येथे झालेल्या जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यात तीनवेळा निवडून आलेले प्रताप सरनाईक यांचा ओवळा – माजिवडा मतदारसंघदेखील भाजपचाच असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी मनोहर डुंबरे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदर्भ देत ओवळा- माजिवड्यातून भाजपचाच आमदार निवडून येईल, असे सांगून टाकले. ते म्हणाले, ओवळा-माजात भाजपचा आमदार हवा हे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न असून युतीबिती डोक्यातून काढून टाका. जे काय व्हायचे ते होईल, असे सांगितले..

इजा बिजा आणि तिजा

ओवळा- माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे नगरसेवक जास्त असल्याचा मुद्दादेखील मनोहर डुंबरे यांनी मांडला. या मेळाव्यास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर हेदेखील उपस्थित होते. मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्षपदी किशोर शर्मा यांची नियुक्ती झाली असून ते माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे समर्थक मानले जातात. भाजपने आता जाहीरपणे कल्याण, ठाणे लोकसभेनंतर ओवळा- माजिवडा विधानसभेवर डोळा ठेवल्याने मिंधे गटाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

गीता जैन यांनाही धक्का देणार

भाजपचे प्रभारी मनोहर डुंबरे यांनी आपल्या भाषणात मीरा- भाईंदर मतदारसंघातसुद्धा भाजपचा आमदार हवा असे सांगितले, गेल्यावेळी नरेंद्र मेहता यांचा पराभव झाला होता. मात्र आता त्यांना पुन्हा निवडून द्यायचे आहे असे स्पष्ट केले. त्यामुळे विद्यमान आमदार गीता जैन यांनाही धक्का देण्याच्या तयारीत भाजप असल्याचे बोलले जात आहे.