परप्रांतीय मजूर मुंबईत परतू लागले, 25 जुलैपर्यंतच्या गाडय़ा फुल

3049

कोरोनाच्या संसर्गाने मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात गेलेले मजूर आता पुन्हा मुंबईत परतू लागले असून रेल्वेने सुरू केलेल्या स्पेशल गाडय़ांना आता गर्दी वाढत चालली आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार 26 जूनपर्यंत 3 लाख 44 हजार 188 मजूर मुंबईत परतले आहेत. त्यात फेरीवाले, छोटेमोठे पुटिरोद्योग करणाऱया कामगारांसह टॅक्सीवाल्यांची संख्या मोठी आहे.

कोरोनामुळे देशभर 25 मार्चपासून लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर मुंबईतून हातावर पोट असणाऱया मजुरांनी गाशा गुंडाळत आपल्या गावाचा रस्ता पकडला. मजुरांचे लोंढेच्या लोंढे मिळेल त्या मार्गाने आणि वाहनांनी उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, झारखंड आणि बंगालमध्ये परतू लागले. त्यामुळे 1 मेपासून रेल्वेने ‘श्रमिक स्पेशल’ गाडय़ांना सोडण्यास सुरुवात केली. तर 12 मेपासून राजधानीच्या मार्गावर 30 वातानुपूलित स्पेशल गाडय़ांना सोडण्यात आल्या. त्यानंतर 1 जूनपासून रेल्वेने वातानुपूलित आणि साधे कोच असलेल्या 200 प्रवासी मेल – एक्स्प्रेस सुरू केल्या. या गाडय़ांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

दरभंगा, वाराणसी, पाटलीपुत्र, लखनऊ, दानापूर, गुवाहाटी, भुवनेश्वर, तिरुअनंतपुरम, हैदराबाद, बंगळुरू स्थानकातून मुंबईला येणाऱया सर्व स्पेशल गाडय़ांची तिकिटे फुल्ल झाली असून 25 जुलैपर्यंतच्या गाडय़ांना प्रचंड गर्दी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या