लातूर जिल्ह्यातील मुरुड अकोला येथे सौम्य भूकंपाची नोंद; घाबरण्याची गरज नाही, सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन

लातूर जिल्ह्यातील मुरुड अकोला परिसरात मंगळवारी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास 2.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू लातूर शहराच्या पश्चिम बाजूस मुरुड अकोला परिसरात असून, भूकंपाची खोली ५ किलोमीटर आहे. ही भूकंपाची नोंद सौम्य स्वरूपाची असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांचे पालन करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भूंकपाचे धक्के जाणवल्यास सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडा. जर तुम्ही कच्च्या घरात किंवा जुन्या इमारतीत राहत असाल तर तात्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेत जा. जवळच्या सुरक्षित पक्क्या घरात किंवा भूकंपरोधक इमारतीत तात्पुरता आसरा घ्या. घरात असल्यास टेबल, पलंग किंवा मजबूत फर्निचरच्या खाली आश्रय घ्या. खिडक्या, काचेच्या वस्तू किंवा भिंतीपासून दूर रहा. विजेचे मुख्य स्विच बंद करा.

भूकंपानंतर जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करा आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवा. गॅस, पाणी आणि वीज यांच्या लाईनची तपासणी करा आणि काही नुकसान झाले असल्यास संबंधित विभागाला कळवा. सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आपत्कालीन परिस्थितीसाठी स्थानिक प्रशासनाशी किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संपर्क साधा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण लातूर यांच्यामार्फत नागरिकांना शांत राहून, कोणत्याही अफवांवर लक्ष न देता, सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.