
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत दुधात भेसळ करणाऱ्या एक टोळीच्या चार सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ करून विकत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी छाप्यात एकूण 1075 लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले असून यामध्ये अमूल, महानंदा आणि गोवर्धन ब्रँडच्या दूध पिशव्या, ब्लेड, मेणबत्ती, कैची आणि इतर साहित्यासह मोठ्या प्रमाणावर दुधाच्या रिकाम्या पिशव्याही जप्त केल्या आहेत. त्यामुळे दुध भेसळखोर कशाप्रकारे मुंबईकराच्या आरोग्याशी खेळतात हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
बुधवारी रात्री खबऱ्यांमार्फत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दुध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सांताक्रूज, गावदेवी, डावरी नगर, वाकोला परिसरात मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वाकोल्याच्या सुभाष नगर आणि डावरी नगरमधील दोन खोल्यांमध्ये गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून 3 पुरुष आणि एका महिलेला अटक केली आहे. भेसळ करण्यासाठी दुधाच्या पिशवीचा कोपरा कापून नंतर भेसळयुक्त दुध भरून पुन्हा पॅकींग केली जात होती. दुधात भेसळ करणाऱ्या या ऱॅकेटमधील 4 आरोपीना अटक केली असली तरी अजूनही 2 आरोपी फरार आहेत. त्यामुळे या रॅकेटची आणखी पाळेमुळे कुठे आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.



























































