
म्हशीच्या दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ झालेली असतानाच आता गाईच्या दुधाची दरवाढ अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुधाच्या तुटवडय़ामुळे राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱया दुधाचा खरेदी दर 40 रुपयांपर्यंत गेला आहे. तसेच दुधाच्या सहउत्पादनांवरही जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे गणपतीच्या आधी गाईच्या दुधाच्या दरात प्रतिलिटरमागे दोन रुपयांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी लवकरच महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक कल्याणकारी संघाची बैठक होणार आहे.
सध्या प्रमुख दूध डेअरींच्या प्रतिलिटर गाईच्या दुधाचा विक्री दर 50 रुपये आहे. राज्यात दुधाचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांकडून 35-36 रुपये प्रतिलिटर दराने दुधाची खरेदी करावी लागत आहे. तसेच त्याचा संकलन, वाहतूक, कूलिंग खर्च सहा रुपयांच्या घरात आहे, तर प्रोसेसिंग, पॅकिंग आणि वितरणाचा खर्च वेगवेगळय़ा डेअरींचा भिन्न असला तरी दहा रुपये आहे. त्यामुळे एक लिटर दुधाची विक्री केल्यानंतर अनेक डेअरींना घाटा सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक कल्याणकारी संस्थेच्या सभासद डेअरींची वाढीव खर्चाबाबत प्राथमिक चर्चा झाली.























































