केंद्र सरकारविरुद्ध गिरणी कामगारांचे तीव्र आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकार नियंत्रित एन.टी. सी.च्या दादर, दादासाहेब फाळके रोडकरील टाटा मिलमध्ये गिरणी कामगारांनी आज केंद्र सरकारविरोधी तीव्र निषेध आंदोलन छेडले. एकतर गिरण्या पूर्ववत चालवा अन्यथा कामगारांना पगार द्या, अशी मागणी आंदोलना द्वारे करून आपल्या व्यथांना जाहीरपणे वाचा फोडली आहे. कामगारांनी आंदोलन करताना मास्क आणि सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने गिरणी कामगारांचे हे निदर्शन आंदोलन आयोजित करण्यात आले होते. दिनांक 22 मार्च पासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. जरी लॉकडाऊन असले तरी उद्योग, कारखान्या तील कामगारांना पूर्ण पगार दिला जाईल, अशी पंतप्रधानांनी आश्वासन दिले होते. मुंबईत टाटा, पोदार, ई.यू.मिल क्र 5 या गिरण्या चालत आहे, तर दिग्विजय मिल अंशत: चालत आहे. या गिरण्यातील कामगारांना लॉकडाऊनच्या काळातील पूर्ण पगार देण्यात आलेला नाही. या प्रकरणी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी एन.टी.सी. व्यवस्थापनाला पत्र पाठवून कामगारांच्या व्यथेकडे लक्ष वेधले आहे. टाटा मिलमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या आंदोलनात खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण संबंधित उपाध्यक्ष सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे यांची भाषणे झाली.