
कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या विशिष्ट समाजातील डॉक्टरांवर हल्ला करण्याबाबत चिथावणी देणारे भाषण सोशल मीडियावर अपलोड करणारा एमआयएमचा कार्यकर्ता सध्या दुबईत असून त्याच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढण्यात आली आहे, अशी माहिती आर.ए.के. मार्ग पोलिसांच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली.
एमआयएमचा कार्यकर्ता अबू फैजल याने दोन समाजात तेढ निर्माण करणारा व्हिडीओ युटय़ूब आणि फेसबुककर अपलोड केला असून फैजल विरोधात कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने पोलिसांना द्यावेत अशी मागणी करत इम्रान खान याने मुंबई उच्च न्यायालयात ऍड. विवेक शुक्ला यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के.के. तातेड यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्स मार्फत सुनावणी घेण्यात आली. शिवडीच्या आर.ए.के. मार्ग पोलिसांच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाला सांगण्यात आले की, फैजल हा सध्या दुबई येथे असून त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत या प्रकरणी फेसबुक, ट्विटर आणि गुगललाही प्रतिवादी करण्याचे आदेश दिले व सुनावणी 23 जूनपर्यंत तहकूब केली.

























































