
सामना ऑनलाईन। मुंबई
अनुष्का शर्मा, सोनम कपूर व नेहा धुपियानंतर आता आणखी एक स्टारपुत्र बोहल्यावर चढणार आहे. ८० च्या दशकातले सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह पुढच्या महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. बॉलिवूड स्टार शीला व दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची कन्या व अभिनेत्री मदालसा हिच्याबरोबर मिमोह विवाह करणार आहे. ७ जुलैला उटीतील ‘द मोनार्क’ हॉटेलमध्ये हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
मातृमुखी असलेल्या मिमोहचे नशीब बॉलिवूडमध्ये काही फळले नाही. यामुळे तसा तो कधी चर्चेतही आला नाही. पण गेल्या वर्षी मिमोहने पॉर्नस्टार केडेन क्रॉसबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आणि तो पुन्हा प्रकाशझोतात आला. केडेन खूप सुंदर व नम्र असल्याचे मिमोहने म्हटलं होतं. तसंच तिला भेटणं हे स्वप्नवत असल्याचंही तो म्हणाला होता. त्यावरुन अनेकांनी तो केडेनबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं. पण मिमोह किंवा मिथुनदा यांनी कधीही याबद्दल उघड विधान केलं नव्हतं. त्यानंतर परत मिमोह चर्चेतून गायब झाला. पण आता थेट त्याच्या लग्नाची गोष्ट समोर आल्याने मिमोह पुन्हा प्रकाशझोतात आला आहे.
मदालसा हिने गणेश आचार्य यांच्या एंजेल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. पण तीही फार चमकली नाही.

























































