राणीचे इंजिन नटले, सजले; माथेरानच्या टॉयट्रेनला नवा लूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेले थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या माथेरानची राणी आता कात टाकणार आहे. माथेरानच्या राणीचे इंजिन नटले आणि सजले असून या टॉयट्रेनचा नवा लूक लवकरच पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. मध्य रेल्वेकडून या डिझेल इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचे रूप देण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये आता लाडक्या राणीचे नवे लूक पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

जागतिक दर्जाच्या माथेरान येथे आलेल्या पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून 1907 साली नॅरो गेज मार्गावर टॉयट्रेन सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर पर्यटकांची रेलचेल वाढली. नेरळ- माथेरान येथे चालवण्यात येणाऱ्या माथेरानच्या राणीचे इंजिन डिझेलवर चालते. मात्र भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वेकडून या इंजिनला वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देण्यासाठी मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेत अभियंते आणि तंत्रज्ञांची एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम स्टीम इंजिन हूडचे मॉडेल तयार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.

हे बदल करणार
माथेरानच्या राणीला हेरिटेज लूक देण्यासाठी अनेक तांत्रिक प्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. सध्याच्या इंजिनचे हूड काढून त्याठिकाणी नवीन ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचे उत्पादन आणि फिटिंग करण्याचे काम सुरू आहे. या नव्या लूकसाठी डिझेल इंजिनमध्ये बदल होणार आहेत. हे इंजिन आकर्षक दिसावे यासाठी पेंटिंग आणि स्टिकर्सने सजावट करण्यात येणार आहे. हे इंजिन माथेरानच्या नॅरो गेज मार्गावर सुरळीत चालावे आणि त्याचे ऐतिहासिक सौंदर्यदेखील राखले जावे यासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.