
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आदरातिथ्य क्षेत्रातील घटकांसमवेत सुमारे 2 हजार 905 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून राज्याच्या विविध भागात हॉटेल, रिसॉर्ट, वेलनेस सेंटर्स, हेल्थ फार्म, थिम पार्प, मेडिटेशन सेंटर, रोपवे, स्विमींग पूल, हॉटेल स्पा, आदी पर्यटन सुविधांची निर्मिती होणार आहे. यातून सुमारे 6 हजार 754 इतक्या रोजगाराची निर्मिती होणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे करार आज करण्यात आले.
राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हे महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, राज्य सरकारने आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला असून यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. यापुढील काळातही या क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलू, असे यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, सहायक संचालक रवींद्र पवार यांच्यासह आदरातिथ्य क्षेत्रातील उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते.
या कंपन्यांसोबत करार
मांडके अँड मांडके ग्रुप (असगोली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी), महर्षी वेदीक हेल्थ प्रा.लि. (वहनगांव, ता. मावळ, जि. पुणे), मेसर्स शिवाई कृष्णा रोपवेज (सिंहगड, पुणे), हॉटेल नागपूर अशोक (लक्ष्मी नगर, नागपूर), ऑटोमॅटीक होटेल्स अँड रिसॉर्टस् प्रा.लि. (सातपूर, नाशिक), ब्लू शाईन हॉस्पिटॅलिटी (मुनगे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग), बीच कॉटेजेस (मोरवे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग), ओशन ह्यू रिसॉर्टस् (मुनगे सदेवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग), नीलकंठ लेइझर एलएलपी (हातगड, ता. सुरगणा, जि. नाशिक), लेक ह्यू व्हेन्च्युअर्स (टाकळी सीम, नागपूर), साईओ इन्फ्रा (जावळी, महाबळेश्वर), मेसर्स ट्रायोटा व्हेन्च्युअर्स (चिखलठाणा औद्योगिक क्षेत्र, संभाजीनगर), श्रीश्री इन्फ्रान्स्ट्रक्चर (मेहरुन, जि. जळगाव) या कंपन्यांबरोबर विविध प्रकल्प, आदरतिथ्य उद्योग यांना चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले. हे सर्व प्रकल्प जून 2022 ते 2024 पर्यंत पूर्ण होणार आहेत.

























































